प्रतिनिधी / शिराळा
शिक्षण घेण्याचे स्वातंत्र्य विद्यार्थ्याला मिळणे, हे आपल्या देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक आहे. असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर डी. टी. शिर्के यांनी केले. ते शिराळा येथील विवेकानंद व्याख्यानमालेत बोलत होते. व्याख्यानमालेचे हे चोविसावे वर्ष आहे. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक वैजनाथ महाजन होते.
डॉ. शिर्के यांनी ‘उच्च शिक्षणातील नव्या दिशा ‘ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, समाजाशी नातं जोडणं त्यांच्या विषयावर चिंतन करणे, हे कुलगुरूंचे कर्तव्य आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार बहुशाखीय शैक्षणिक संस्थांचा आणि महाविद्यालयांची निर्मिती करावी लागणार आहे. हे धोरणात विद्यार्थी केंद्रबिंदू मानून तयार केले आहे. विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य देण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या ज्ञान कक्षा विस्तारण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. मुख्य विषयाबरोबरच इतर विषयांचे ज्ञानार्जन करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.