जिल्हा परिषदेच्या आवारात फिरणे भोवले, : विनाकारण घुटमळणाऱया शिक्षकांवर पहिलीच कारवाई
प्रतिनिधी / सातारा
विनाकारण जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या आवारात फिरणाऱया शिक्षकांवर कारवाई करण्याबाबतचा आदेश दि. 8 रोजी काढण्यात आला. तो आदेश सर्व गटशिक्षणाधिकाऱयांमार्फत पोहचवला गेला आहे. तरीही काही शिक्षकांनी जिल्हा परिषदेत आपली हजेरी लावली. त्याचे पुरावेच काही शिक्षकांनी प्राथमिकच्या शिक्षणाधिकाऱयांकडे पाठवताच त्या पाच शिक्षकांना कारणे दाखवा, अशी नोटीस बजावण्यात आली आहे.
सातारा जिह्यात शिक्षकांच्या अनेक संघटना आहेत. शिक्षकांचे नेते हे शाळा सोडून जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या आवारातच फिरत असतात. कुठे आमदार, खासदार व अधिकाऱयांच्या बंगल्यावर दिसत असतात. अशा शिक्षकांवर आजपर्यंत कारवाई झाल्याचे दिसत नाही. परंतु कोरोनाच्या अनुषंगाने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आवारात विनाकारण फिरणाऱया अशा शिक्षकांवर कारवाई करण्याबाबतचे पत्रच जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी प्रतिभा कोळेकर यांनी काढले आहे. तसा आदेश प्रत्येक पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱयांना पत्र काढले आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेत राजेंद्र लोखंडे, अनिल जायकर, दत्तात्रय कोरडे, महेंद्र जानुगडे यांच्या एकजण शिक्षक हारतुरे घेवून व एका शिक्षकांच्या वाढदिवसानिमित्त गेल्याच्या तक्रारी शिक्षणाधिकाऱयांकडे झाल्या. त्यानुसार शिक्षणाधिकाऱयांनी संबंधित शिक्षकांना नोटीस बजावल्या आहेत. त्यावरुन ते शिक्षक म्हणतात की आम्ही शाळा सकाळच्या सत्रात सुरु करण्याच्या अनुषंगाने भेटायला गेलो होता. वेळ मागून गेलो होतो, असे त्या नोटीस बजावलेल्या शिक्षकांनी सांगितले. दरम्यान, नोटीस बजावल्यामुळे शिक्षकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.









