किरण ठाकुर यांचे प्रतिपादन, मुरगाव शिक्षण संस्थेचा स्थापनादिन कार्यक्रम
अॅड. आत्माराम नाडकर्णी यांना ‘एमईएस अभिमान श्री’ बहुमान प्रदान
प्रतिनिधी/ वास्को
एकेकाळी भारताकडे कणखर नेतृत्वाची कमतरता होती. आज देश बदलत आहे. बलाढ्या बनलेला आहे. आपण जागतिक शक्ती बनवण्याच्या दिशेने जात आहोत. कोणत्याही राष्ट्राला सशक्तपणे उभे राहायचे असेल तर शिक्षणाचा प्रसार महत्त्वाचा असतो. शिक्षण ही चळवळ व्हायला हवी. तरच आम्ही पुढारलेल्या जागतिक शक्तींशी स्पर्धा करू शकतो, असे प्रतिपादन ‘तरुण भारत’चे समूह प्रमुख तथा सल्लागार संपादक व लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकुर यांनी केले.
मुरगाव शिक्षण संस्थेच्या स्थापनादिनानिमित्त गोव्याचे माजी अॅडव्होकेट जनरल अॅड. आत्माराम नाडकर्णी यांना गौरविण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे या नात्याने किरण ठाकुर बोलत होते. काल शनिवारी झुआरीनगरातील एमईएस कॉलेजच्या राज तारा ऑडिटोरियम बीबीए ब्लॉकमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संपादक किरण ठाकुर यांच्या हस्ते प्रसिद्ध कायदेतज्ञ व दीर्घकाळ गोव्याचे अॅडव्होकेट जनरल राहिलेले एमईएसचे माजी विद्यार्थी अॅड. आत्माराम नाडकर्णी यांना ‘एमईएस अभिमान श्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुरगाव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. माधवराव कामत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर अॅड. आत्माराम नाडकर्णी यांच्यासह संस्थेच्या खजिनदार प्रा. ललिता जोशी, एमईएसच्या वसंतराव जोशी, महाविद्यालयाच्या प्राचार्य मनस्वी कामत, संस्थेचे सदस्य अतुल जाधव उपस्थित होते. या कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष परेश जोशी तसेच प्रशांत जोशी, पराग जोशी, सत्कारमूर्ती अॅड. नाडकर्णी यांचे कुटुंबीय, एमईएस परिवार व मान्यवर उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे किरण ठाकुर यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित करताना शिक्षण, शिक्षणाची गुणवत्ता व शिक्षण प्रसारावर भर दिला. ते म्हणाले की, कोणत्याही देशाला जर सक्षम बनायचे असेल तर त्या देशात शिक्षणाचा पाया सक्षम असावा लागतो. शिक्षण प्रसाराच्या बळावर देश भरारी घेऊ शकतो. आपले वडील बाबुराव ठाकुर यांनी शिक्षण ही चळवळ व्हायला हवी, असा मंत्र समाजाला दिला होता. त्यांनी शिक्षणाच्या प्रसारासाठी योगदान दिले. मुरगाव शिक्षण संस्थेची स्थापना आणि तिच्या प्रगतीसाठी योगदान दिलेल्या अण्णा जोशी यांचीही तीच भावना होती. ज्या काळी शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध नव्हत्या त्या काळात अण्णांनी हे आव्हान स्वीकारले, असे सांगून किरण ठाकुर यांनी वसंतराव उर्फ अण्णा जोशी यांच्या कार्याची माहिती दिली.
माजी विद्यार्थ्यांनी शैक्षणिक विकासासाठी योगदान द्यावे!
शिक्षणाबरोबरच समाजाला संस्कारही महत्त्वाचे आहेत. सुसंस्कारीत शिक्षण, गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा प्रसार होणे महत्त्वाचे आहे. आज आपला देश शैक्षणिक विकासामुळे बलशाली होत आहे. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण आता आलेले आहे. याचाही चांगल्या शिक्षण प्रसारासाठी लाभ होणार आहे. चीन व अमेरिकेसारख्या पुढारलेल्या आर्थिक शक्तीशी आम्हाला स्पर्धा करायची आहे. त्यात शिक्षण महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे किरण ठाकुर म्हणाले. शिक्षणाच्या विकासासाठी सर्वांनी योगदान देणे गरजेचे आहे. माजी विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या विकासासाठी योगदान देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
मुरगाव शिक्षण संस्थेचे संस्थापक प्राचार्य माधवराव कामत यांचे बेळगावात झालेले शिक्षण आणि तेथील विद्यादानाचे कार्य व शेवटी माधवराव कामतांचे बेळगावहून मुरगाव शिक्षण संस्थेत रूजू होणे या घटनांचा उल्लेख करून किरण ठाकुर यांनी बेळगाव आणि मुरगाव शिक्षण संस्थांच्या संबंधांवर प्रकाश टाकला. बेळगाव आणि गोवा मुक्ती संग्राम, भारतीय स्वातंत्र्यसंग्राम यांच्यातील ठळक आठवणी सांगून ठाकुर यांनी स्वातंत्र्य संग्रामाला उजाळा दिला. छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांकडेही दूरदृष्टी होती. स्वातंत्र्याच्या 27 वर्षांपूर्वीच त्यांनी ब्रिटीशांना चेतावणी दिली होती. त्याचा परिणाम भारत स्वतंत्र होण्यात झाला. गोवा त्याच क्षणी मुक्त व्हायला हवा होता. मात्र, कणखर नेतृत्वाअभावी काही गोष्टी होऊ शकल्या नाहीत. आज भारत बलाढ्या शक्ती म्हणून ओळखला जात असून पंतप्रधान मोदींच्या नेतृत्त्वाखाली मनोहर पर्रीकरांनी संरक्षणमंत्री या नात्याने केलेला सर्जिकल स्ट्राईक त्याचीच एक झलक होती. आम्ही जागतिक महासत्ता बनविण्याकडे वाटचाल करीत आहोत. इतर देशांचेही भारताला सहकार्य मिळत आहे, असे किरण ठाकुर म्हणाले.
नैतिक मूल्यांच्या विकासासाठी योगदान द्यावे!
प्राचार्य माधवराव कामत यांनी यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात मुरगाव शिक्षण संस्थेच्या विकासासाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिले, अशा सर्वांचे आभार व्यक्त केले. संस्थेला अशीच प्रेरणा मिळावी अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली. बदलते विज्ञान व तंत्रज्ञ या विषयावरही प्रा. कामत बोलले. विज्ञान, तंत्रज्ञानाने भरीव विकास साधलेला आहे. मात्र, वैज्ञानिक मूल्ये नैतिक मूल्यांना वरचढ ठरू नये. विज्ञान आपत्ती ठरू नये. ते धोकादायक आहे. नैतिक मूल्यांच्या विकासासाठी आपण सर्वांनी कार्यरत राहायला हवे. समाजाला उजेडाकडे नेण्याचा प्रयत्न सर्वानी करायला हवा, असे आवाहन प्रा. कामत यांनी केले.
पल्या यशामागे शिक्षण संस्था, शिक्षकांची प्रेरणा : अॅड. नाडकर्णी
‘एमईएस अभिमान श्री’ बहुमान प्राप्त एमईएसचे माजी विद्यार्थी अॅड. आत्माराम नाडकर्णी यांनी मुरगाव शिक्षण संस्थेविषयी कृतज्ञता व्यक्त करताना आपण आज जो काही आहे तो केवळ आपली शिक्षण संस्था व शिक्षक यांनी दिलेल्या प्रेरणेमुळे असल्याचे नमूद केले. ते म्हणाले की ‘एमईएस अभिमान श्री’ हा आपल्यासाठी आशीर्वाद आहे. मातृदेवो भव, पितृदेवो भव व आचार्य देवो भव हे आपण मानतो. एमईएसचे व आपले जिव्हाळ्याचे संबंध आहेत. अण्णा जोशी यांचाही सहवास आपल्याला लाभला होता. अण्णांनी आपल्या जीवनात या शिक्षण संस्थेसाठी मोठा त्याग केल्याचे सांगून अॅड. नाडकर्णी यांनी एमईएसची वास्को शहरातील त्या काळातील जुनी इमारत, आपले वर्गमित्र तसेच शिक्षकांच्या सहवासातील आठवणींना उजाळा दिला.
प्रारंभी अतुल जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्राचार्य मनस्वी कामत यांनी प्रास्ताविक करताना मुरगाव शिक्षण संस्थेची स्थापना, विकास, शैक्षणिक प्रगती विषयी माहिती दिली. स्थापना दिवस तसेच ‘एमईएस अभिमान श्री’ बहुमानाविषयीही त्या बोलल्या. प्रा. सिदालिया बोदाडे यांनी अॅड. आत्माराम नाडकर्णी व संपादक किरण ठाकुर यांची ओळख करून दिली. प्रा. ललिता जोशी यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता









