बालिका आदर्श शाळेत नितीन मोहोळकर प्राथमिक शाळेचे नामकरण : मृणाली मोहोळकर यांची शाळेला 20 लाख रुपयांची देणगी
प्रतिनिधी / बेळगाव
शाळा चालविणे कठीण होत असताना बालिका आदर्श शाळेमध्ये मात्र विद्यार्थिनींची संख्या वाढत आहे. व्यवस्थापन मंडळाइतकेच याचे श्रेय शिक्षकांना जाते. शिक्षणाचा दर्जा विद्यार्थ्यांना आणि पालकांना आकर्षित करतो तेव्हाच शाळांची प्रगती होते, असे मत डॉ. शोभा शानभाग यांनी व्यक्त केले.
टिळकवाडी फिमेल एज्युकेशन सोसायटीच्या बालिका आदर्श शाळेच्या प्राथमिक मराठी शाळेचे ‘नितीन मोहोळकर प्राथमिक शाळा’ असे नामकरण गुरुवारी करण्यात आले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. व्यासपीठावर टीएफईच्या सचिव माधुरी शानभाग, अध्यक्ष गोविंदराव फडके, सदस्या रोहिणी गोगटे, सेवंतीलाल शाह, एसकेई सोसायटीचे अध्यक्ष किरण ठाकुर, नगरसेविका वाणी जोशी, मुख्याध्यापक एन. ओ. डोणकरी व मंजुनाथ गोलेहळ्ळी उपस्थित होते. प्रारंभी स्वागतगीत झाल्यानंतर दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर नितीन मोहोळकर मराठी प्राथमिक शाळेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले.
स्वागत व प्रास्ताविक करताना गोविंद फडके यांनी स्त्राr शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन 1937 साली ही शाळा सुरू झाली व 84 वर्षांत शाळेने हजारो विद्यार्थिनींना शिक्षण दिले, असे सांगितले. यानंतर शोभा शानभाग यांनी या शाळेच्या आपण विद्यार्थिनी असून शाळेने लळा लावला आहे. शाळेचे ऋण फेडणे हे आम्हा कुटुंबीयांचे कर्तव्य आहे, असे त्या म्हणाल्या. माधुरी शानभाग यांनी प्रभू आजगावकर यांच्या मुली या शाळेत घडल्या, याची जाणीव या कुटुंबीयांनी सदैव ठेवली, असे सांगून नितीन मोहोळकर व त्यांच्या आई निशा यांच्या कार्याची माहिती दिली.
किरण ठाकुर म्हणाले, माजी विद्यार्थ्यांनी शाळेकडे लक्ष देण्याची गरज आहे. आज शैक्षणिक क्षेत्रात अनेक बदल होत आहेत. जो देश शिक्षणामध्ये प्रथम तो जगात प्रथम क्रमांकावर राहतो. नवीन पिढीकडून अनेक अपेक्षा आहेत. त्यामुळे नवीन पिढीला उत्तेजन देणे हे शिक्षकांचे कर्तव्य आहे, असेही ते म्हणाले व त्यांनी शाळेला भरघोस देणगी जाहीर केली.
वाणी जोशी यांनी शाळेला सहकार्य करण्याची ग्वाही दिली. अध्यक्षीय समारोप करताना सेवंतीलाल शाह यांनी विद्यादानाचे कार्य मोठे आहे. चांगल्या कार्याला चांगली माणसे हवीत. त्यामुळे माजी विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी शाळेच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील राहवे, असे आवाहन केले. सूत्रसंचालन कीर्ती चिंचणीकर यांनी केले. आनंद गाडगीळ यांनी आभार मानले.









