पहिल्या दोन दिवसांत दोन पंच, पोलीस पाटलाची झाली साक्ष
प्रतिनिधी / सिंधुदुर्ग:
प्रियकरासोबतच्या अनैतिक संबंधात अडसर होतो म्हणून पत्नी व प्रियकराच्या हातून गडहिंग्लज येथील शिक्षक विजयकुमार गुरव यांच्या हत्याप्रकरणाची सुनावणी सिंधुदुर्गनगरी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. आर. कदम यांच्या न्यायालयात सुरू झाली आहे. या सुनावणीच्या पहिल्या दोन दिवसात गेळे-आंबोली पोलीस पाटील व पंच म्हणून असलेले ग्रामविकास अधिकारी रतीलाल बहीराम व कावळेसाद दरीतून मृतदेह काढून देणारे बाबल आल्मेडा आदींच्या सरकार पक्षातर्फे महत्वपूर्ण साक्षी नोंदविण्यात आल्या.
गडहिंग्लज येथे राहणाऱया विजयकुमार गुरव यांची त्यांच्या राहत्या घरी हत्या करून त्यांचा मृतदेह वाहनातून थेट आंबोली येथील कावळेसाद दरीजवळ आणून तो दरीत फेकून देण्यात आला होता. या प्रकरणाचा छडा लावल्यानंतर सावंतवाडी पोलिसांनी शिक्षक विजयकुमार गुरव यांची पत्नी जयलक्ष्मी गुरव व तिचा प्रियकर सुरेश चोथे याच्यावर 302, 120 (ब) व 34 अन्वये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाची सुनावणी येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांच्या कोर्टात सुरू झाली आहे.
सुनावणीच्या पहिल्या दिवशी गेळे पोलीस पाटील यांची साक्ष तपासण्यात आली. यावेळी पोलीस पाटील यांनी आपणास अज्ञात पर्यटकाने कावळेसाद परिसरातील रेलिंगवर रक्ताचे डाग दिसत असल्याचे कळविल्यानुसार आपण त्याची प्रत्यक्ष खातरजमा करून त्याच दिवशी सायंकाळी आंबोली पोलीस आऊट पोस्टला याची कल्पना दिली व दुसऱया दिवशी सावंतवाडी पोलिसांनी समक्ष येऊन घटनास्थळाचा पंचनामा केला आणि मृतदेह काढण्यासाठी बाबल आल्मेडा व त्यांचे सहकारी दरीत उतरताना आपण पाहिल्याचे सांगितले.
त्यानंतर पंच म्हणून काम पाहिलेल्या ग्रामविकास अधिकारी रतिलाल बहिराम यांची साक्ष तपासण्यात आली. यावेळी बहिराम यांनी आपण घटनास्थळाचा पंचनामा करीत असताना दरी काठावरच्या रेलिंग व फुटपाथवरील रक्ताचे डाग पाहिल्याचे सांगितले. तसेच बाबल आल्मेडा व त्यांचे सहकारी यांनी दरीतून मृतदेह काढल्यानंतर त्या मृतदेहाच्या तोंडावर प्लास्टिकची पिशवी घालून ती दोरीने आवळल्याचे दिसून आले. तसेच सदर मृतदेहाच्या हातात दोर गुंडाळलेला होता, त्याचप्रमाणे तो मृतदेह कुजलेला होता, असे सांगितले. त्यानंतर सायंकाळी आपण घरी गेल्यानंतर पुन्हा पोलिसांकडून निरोप येऊन त्यानुसार आपणास सावंतवाडी पोलीस स्थानकात बोलावण्यात आले व पोलिसांना उशिराने दरीत सापडलेला व या हत्येत वापरण्यात आलेला लोखंडी रॉड आपणास दाखवण्यात आला व त्यावरील रक्ताचे डागही आपण पाहिल्याचे त्यांनी सांगितले.
सुनावणीच्या दुसऱया दिवशी दरीतून मृतदेह बाहेर काढणाऱया बाबल आल्मेडा यांची साक्ष झाली. या साक्षीमध्ये त्यांनी मृतदेह आपण बाहेर काढल्याची, त्याचप्रमाणे दुसऱयावेळी आपणास अन्य मुद्देमाल दरीतून बाहेर काढण्यासाठी ज्यावेळी पुन्हा दरीत उतरवण्यात आले. त्यावेळी दरीतून मृतदेह सापडलेल्या ठिकाणापासून काही फूट अंतरावर रक्ताळलेली गादी, उशा आणि गाडीतील दोन मॅट सापडून आल्याचे त्यांनी सांगितले.
सलग दोन दिवस पार पडलेल्या या सुनावणीत सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून ऍड. अजित भणगे यांनी काम पाहिले व त्यांना ऍड. काकतकर व ऍड. मिहिर भणगे यांचे सहाय्य लाभले.
या सुनावणीमध्ये आरोपीतर्फे पंच व साक्षीदारांची उलटतपासणी घेताना ऍड. विरेश नाईक, ऍड. निकम आणि ऍड. भोसले यांनी साक्षीदार व पंचांना अनेक प्रश्न विचारले. मृतदेह काढला त्याच दिवशी हत्येमध्ये वापरलेले हत्यार, गादी व उशा का बाहेर काढल्या नाहीत? असे विचारले असता पंचांनी दरीतील कारवी नावाच्या वनस्पतीमुळे आपणास त्यादिवशी गादी, उशा दिसल्या नसल्याचे सांगितले.
आता पुढील सुनावणी 14 जानेवारी रोजी होणार असून यावेळी कॉन्स्टेबल देसाई आणि पहिल्या दिवशी आकस्मिक मृत्यू म्हणून दाखल करणाऱया तपासी अधिकारी निरिक्षक जाधव यांची साक्ष होणार आहे.