रोज 4 तास काम करावे : शिक्षण संचालकांचा आदेश
प्रतिनिधी / पणजी
सर्व अनुदानप्राप्त शाळांतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱयांनी दि. 22 एप्रिलपासून शाळेत चार तास कामावर हजर राहावे आणि सामाजिक अंतर ठेऊन काम करावे, असा आदेश शिक्षण संचालक वंदना राव यांनी जारी केला आहे.
सकाळी 8 ते 12 किंवा 8.30 ते 12.30 व 9 ते दुपारी 1 या काळात 33 टक्के कर्मचाऱयांना बोलावण्यात यावे. तीन गटात काम करून घ्यावे. त्यांना मास्क आणि सेनिटायझरची सक्ती तसेच सामाजिक अंतर ठेऊनच त्यांनी काम केले पाहिजे, असे आदेशात म्हटले आहे.
या कर्मचाऱयांच्या वाहतुकीची व्यवस्था काय असेल याचा कोणताच उल्लेख या आदेशात नाही. तूर्त कदंब बससेवा अपुरी पडत असून वाहतूक व्यवस्था सुरळीत झाल्याशिवाय शाळेतील कर्मचाऱयांना बोलावणे म्हणजे अव्यवस्थेत भर घातल्यासारखे होणार आहे.
शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारीवर्गाचा गोंधळ
दरम्यान, शिक्षण खात्याने याबाबत काल 21 रोजी दुपारपर्यंत कोणतेच परिपत्रक जारी न केल्याने राज्यातील सरकारी तसेच खासगी शाळा, उच्च माध्यमिक विद्यालयांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाचा गोंधळ उडाला होता.
सोमवार दि. 20 एप्रिलपासून काही निवडक सरकारी कार्यालये सुरू झाली. त्याची पूर्वसूचना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली होती. परंतु शाळांमधील कार्यालये सुरु करायची की नाहीत याबाबत कोणतेच निर्देश दिले नव्हते. त्यामुळे शाळेत जावे की नाही असा प्रश्न उभा राहिला होता.
केंद्रीय गृह व्यवहार मंत्रालयातर्फे जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार 3 मे या लॉकडाऊनच्या काळापर्यंत शाळा, शैक्षणिक संस्था बंद ठेवाव्यात असे सूचित करण्यात आले आहे. परंतु शिक्षण खात्याने कोणतेच परिपत्रक जारी केले नसल्यामुळे हे कर्मचारी परिपत्रकाच्या प्रतीक्षेत होते. काही सरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी त्यांच्या शाळेत जाऊन आले व कोणी नसल्याने माघारी फिरले होते.









