आज मडगाव हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार
प्रतिनिधी/ मडगाव
शिक्षणक्षेत्रात तळमळीने कार्य करणारे शिक्षक तसेच गोव्यात हिंदी भाषेच्या उत्कर्षासाठी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आटापिटा करणारे ज्येष्ठ शिक्षक मोहनदास एस. सुर्लकर (88 वर्षे) यांचे काल मंगळवारी गोमेकॉत कोरोनामुळे निधन झाले. आज बुधवारी संध्याकाळी मडगाव हिंदू स्मशानभूमीत त्यांच्यावर कोरोनाच्या नियमानुसार अंत्यसंस्कार केले जातील.
7 नोव्हेंबर 1932 साली जन्मलेल्या मोहनदास सुर्लकर यांनी एम. ए. बीएड, साहित्य रत्न पर्यंतचे शिक्षण घेतले होते. गोमंतक राष्ट्रभाषा विद्यापीठ, गोवा विभागाचे ते कार्याध्यक्षक होते. ‘गोमांचल’ या हिंदी त्रैमासिकाचे संपादक म्हणून कार्यरत होते. आर. बी. प्रचार समिती, वर्धाचे प्रांतीय संचालक (गोवा) होते. आकें-मडगाव येथील टी. बी. कुन्हा न्यू हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक तसेच व्यवस्थापक होते. मडगावच्या विद्यादीप मंडळाचे सदस्य, बाल व महिला कल्याण मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्लीच्या हिंदी सलाहाकार समितीचे सदस्य, लायन्स क्लब आंतरराष्ट्रीयच्या जिल्हा शिक्षण अध्यक्ष होते.
पणजीच्या मिनेझीस ब्रागांझा संस्थेचे माजी उपाध्यक्ष होते. गोव्यात 1958 पासून राष्ट्रीय भाषा हिंदीच्या प्रचारासाठी काम करत होते. या काळात त्यांनी हिंदी शिक्षक प्रशिक्षण संस्थेचे संस्थापक म्हणून काम केले होते. गोवा राष्ट्रभाषा प्रचार समितीचे सचिव आणि त्यानंतर गोमंतक राष्ट्रभाषा विद्यापीठात 1962 ते 1992 पर्यंत काम पाहिले.
विविध शिक्षण संस्थामार्फत योगदान
1958 साली मोहनदास सुर्लकर हे शिक्षकीपेशात रूजू झाले त्यानंतर 1975 ते 1993 पर्यंत टी. बी. कुन्हा न्यू हायस्कूलचे मुख्याध्यापक म्हणून योगदान दिले. गोवा शालांत मंडळावर त्यांनी विविध विभागात योगदान दिले होते. गोवा बोर्डाच्या अभ्यासक्रम समितीवरही ते कार्यरत होते. शिक्षक कल्याण फाउंडेशन समितीवर ते तीन वर्षे कार्यरत होते. देखरेख आणि मूल्यांकन समितीवरही ते तीन वर्षे कार्यरत राहिले. गोवा सर्व शिक्षा अभियान समितीवर तीन वर्षे तसेच काणकोणच्या जवाहर नवोदय विद्यालयासाठी तीन वर्षे योगदान दिले.
विविध राज्य-राष्ट्रीय मानसन्मानाने गौरव
शिक्षण क्षेत्रात दिलेल्या भरीव योगदानाची दखल घेऊन राज्य सरकारने त्यांना 1990 साली सर्वोत्कृष्ट शिक्षकाचा पुरस्कार देऊन गौरव केला होता. 2004 साली मध्ये हिंदी कार्यासाठी ‘गंगा शरण सिंह’ पुरस्काराने भारताचे माजी राष्ट्रपती श्री अब्दुल कलाम यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला होता. शिवाय 2006 मध्ये ‘राष्ट्रीय एकात्मता फेलोशिप’ पुरस्कार तर 2007 मध्ये जायंट्स इंटरनॅशनलचा शैक्षणिक पुरस्कार प्राप्त झाला होता. तामिळ आर्य कलावी काझागन ट्रस्टकडून समाजसेवक महामनी पुरस्कारही मिळाला होता. त्यांची तीन पुस्तके प्रकाशित झाली होती. त्यात मराठीत ‘मंगलसूत्र’, ‘शिखर कथायेम’-अनुवादित कोंकणी कथा व ‘जीवन धारा’ हिंदीचा समावेश आहे.
घरातील पाच व्यक्ती निघाल्या पॉझिटिव्ह
मोहनदास सुर्लकर यांच्या मुलाला कोरोनाची बाधा झाल्याने त्याने सुरवातीला घरातच विलगीकरण स्वीकारले होते. त्यानंतर त्याला ताप येऊ लागला, त्याला संसर्ग झाल्याने गोमेकॉत दाखल करण्यात आले. त्यानंतर घरच्या मंडळीची कोरोना तपासणी करण्यात आली असता सर्वजण निगेटिव्ह निघाले. नंतर हळूहळू घरातील इतरांना ताप येऊ लागला. त्यामुळे पुन्हा सर्वाची चाचणी करण्यात आली. त्यात एकूण पाचजण पॉझिटिव्ह निघाले तर दोघे निगेटिव्ह. पॉझिटिव्ह झालेल्यामध्ये मोहनदास सुर्लकर, त्यांची पत्नी, एक मुलगा, स्नुषा व नातू यांचा समावेश होता. याच दरम्यान, मोहनदास हे घरात घसरून पडले व त्यांच्या डोक्याला किंचित मार लागला. त्यात वयस्क असल्याने त्यांना शिरोडा कोरोना निगा केंद्रात पाठविण्यात आले होते. यावेळी त्यांच्या हाता-पायाची गती मंदावली होती. त्यामुळे शिरोडा कोरोना निगा केंद्रात त्याच्यावर उपचार शक्य नसल्याने, त्यांना मडगावच्या ईएसआय हॉस्पिटलात पाठविण्यात आले मात्र, पत्नी व स्नुषा यांना शिरोडा कोरोना निगा केंद्रात दाखल करून घेण्यात आले.
डोक्याला मार लागल्याने मोहनदास यांना गोमेकॉत पाठविण्यात आले. त्याठिकाणी विविध चाचण्या करण्यात आल्या. त्यात डोक्यात पाणी झाल्याचे निदान करण्यात आले. कोरोनाबाधित व त्यात वयस्क असल्याने डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचे टाळले व डोक्यातील पाणी इंजेक्शनच्या माध्यमांतून काढले. मात्र, त्यांच्या प्रकृतीत विशेष असा फरक पडला नाही. सोमवारी त्यांची प्रकृती अधिकच खालावली व काल मंगळवारी त्यांनी अखरेचा श्वास घेतला. त्याच्यावर चांगले वैद्यकीय उपचार व्हावे यासाठी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत तसेच फातोर्डाचे माजी आमदार दामू नाईक हे प्रयत्नशील राहिले.
शिस्तबद्द तसेच प्रेमळ शिक्षक : दिगंबर कामत
विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांचे ते गुरू होते. मोहनदास सुर्लकर सर यांच्या निधनाने आपल्याला फार दुःख झाले. ते मडगावच्या मॉडेल इंग्लिश हायस्कूलचे शिस्तबद्द तितकेच प्रेमळ शिक्षक होते, त्यांच्या कुटुंबियांबद्दल आपण संवेदना व्यक्त करतो असे श्री. कामत यांनी म्हटले आहे.
एक चांगला शिक्षक गमावला : दामू नाईक
फातोर्डाचे माजी आमदार दामू नाईक यांनीही मोहनदास सुर्लकरसरांच्या निधनावर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी शिक्षणक्षेत्रात दिलेले योगदान अतुलनीय असेच होते. ते आपले गुरू होते. कुठेही गाठभेट झाली तर आपण त्यांचे चरण स्पर्श करून आशीर्वाद घ्यायचो. एकदम मृदू भाषेत इतरांशी संवाद साधणारे शिक्षक गमावल्याचे दुःख होत असल्याचे श्री. नाईक यांनी म्हटले आहे.
हिंदीसाठी कार्य करणारा शिक्षक गमावला : वेलिंगकर
सुभाष वेलिंगकर यांनी ही मोहनदास सुर्लकर यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले असून शिक्षण क्षेत्रात त्यांनी तळमळीने कार्य केले तसेच हिंदी भाषेसाठी आटापिटा करणारे एक सज्जन व्यक्तीमत्व होते असे म्हटले आहे.









