प्रतिनिधी/ खेड
शिक्षण, कामगार व शेतकरीविरोधी धोरणे हाणून पाडण्यासाठी देशातील सरकारी-निमसरकारी कर्मचारी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी 26 नोव्हेंबर रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप करणार आहेत. या देशव्यापी संपात शिक्षक भारती सहभागी होणार असल्याची माहिती शिक्षक भारतीचे कोकण विभागीय अध्यक्ष धनाजी पाटील यांनी दिली.
2 ऑक्टोबर रोजी झालेल्या परिषदेत 10 प्रमुख राष्ट्रीय संघटनांनी सहभाग घेतला होता. या परिषदेत केंद्र व राज्य सरकारने कामगार, शेतकरी व शिक्षक-शिक्षकेत्तर विरोधी धोरणांना पायबंद घालण्यासाठी देशव्यापी संपाची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार गुरूवारी लाक्षणिक संप पुकारण्यात येणार आहे. सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करा, शंभर टक्के अनुदान द्या, व्हॅक्सीन आल्याशिवाय शाळा, महाविद्यालये सुरू करू नका, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱयांची रिक्त पदे त्वरित भरण्याची मागणीही करण्यात आली आहे. याशिवाय सातव्या वेतन आयोगानुसार आश्वासित प्रगती योजना लागू करा, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन त्यांच्या जिल्हय़ातच करा, शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नका, केंद्राप्रमाणे महिला कर्मचाऱयांना दोन वर्षे बाल संगोपन रजा द्या, संस्थांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतनेतर अनुदान सुरू करा, वरिष्ठ व निवडश्रेणी विनाअट लागू करा आदी मागण्यांचा समावेश आहे. आमदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा संप पुकारण्यात येणार आहे. या आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन शिक्षक भारतीचे राज्याध्यक्ष अशोक बेलसरे यांनी केले आहे.









