प्रतिनिधी / बेळगाव
शिक्षक बढती प्रक्रियेनंतर आता शिक्षक बदली प्रक्रिया राबविण्याबाबतच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यामुळे बदलीच्या प्रतीक्षेत असणाऱया शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. त्यादृष्टिकोनातून शिक्षण विभागातर्फे तयार करण्यात आलेले इडीट इम्पलॉय डाटा सिस्टीम अर्थात इइडीएस प्रणालीनुसार बदलीसाठी शिक्षकांना माहिती भरावी लागणार आहे. टीचर डाटा सिस्टीम म्हणजेच टीडीएस प्रणालीनुसार शिक्षण विभागातर्फे यावर्षी इइडीएस हे सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. शिक्षकांना नावापासून सेवेत कार्यरत असलेली व सध्या सेवा बजावत असलेली सर्व माहिती सॉफ्टवेअरच्या माध्यमातून अपडेट करावी लागणार आहे.
शिक्षक बदली प्रक्रियेंतर्गत रिक्त जागांवर शिक्षकांची नियुक्ती तसेच अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची नवीन स्थळी बदली करण्यात येते. बदली प्रक्रिया ऑनलाईन राबविण्यात येत असल्याने अचूक माहिती भरून माहिती अपडेट करण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे. नवीन सॉफ्टवेअर नुकतेच तयार करण्यात आले असून त्यानुसार शिक्षकांकडून माहिती भरली जात आहे. यामुळे बेंगळूर शिक्षण विभागाकडून बदलीचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर ऑनलाईन कौन्सिलिंग प्रक्रियेसाठी शिक्षकांना शिक्षण विभागात हजेरी लावावी लागणार आहे. बदली प्रक्रियेंतर्गत परस्पर बदली, स्वच्छेने बदली, सक्तीची बदली प्रक्रिया पार पडणार आहे.









