प्रतिनिधी / बेळगाव
शिक्षक बदलीच्या प्रतीक्षेत असणाऱया शिक्षकांना फेब्रुवारीपर्यंत वाट पाहावी लागणार असून सदर शैक्षणिक वर्ष बदलीविनाच संपणार आहे. शिक्षक बदली प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती देण्यात आल्याने शिक्षक बदलीचा मार्ग पुढील निर्णयाच्या प्रतीक्षेत अडकला आहे. 17 फेब्रुवारीनंतर शिक्षक बदलीची तारीख जाहीर होणार असल्याने बदलीची प्रतीक्षाच करावी लागणार आहे. गतवर्षी सक्तीच्या बदली प्रक्रियेअंतर्गत अन्याय झालेल्या शिक्षकांसाठी प्रामुख्याने बदली प्रक्रियेअंतर्गत बदलीसाठी प्राधान्य देण्यात येणार होते.
शिक्षक बदली प्रक्रिया प्रामुख्याने शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होताच सुरू होते. मात्र, यंदा कोरोनामुळे सदर बदली प्रक्रिया अडकून पडली होती. कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यानंतर बदली प्रक्रियेला हिरवा कंदील दाखवत बदली प्रक्रियेची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. डिसेंबर महिन्यात कौन्सिलिंग प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. मात्र, शिक्षक निवडणूक तसेच ग्राम पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेळापत्रकात बदल करण्यात आला.
सध्या शिक्षक बदलीच्या कौन्सिलिंग प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली असून फेब्रुवारी महिन्यात पुढील निर्णय होणार आहे. यामुळे 2020-21 हे शैक्षणिक वर्ष बदलीविनाच जाणार आहे.
परिणामी गतवर्षी सक्तीच्या बदली प्रक्रियेअंतर्गत अन्याय झालेल्या शिक्षकांकडून बदलीची स्थगिती उठविण्याबाबत प्रतीक्षा केली जात आहे.