सलग 7 वर्ष 10 टक्के लाभांश दिल्याचा चेअरमन राजेंद्र घोरपडेंचा दावा
प्रतिनिधी/ सातारा
शिक्षक बँकेची 75 वी सर्वसाधारण सभा विरोधकांच्या गेंधळमुळे केवळ पंधरा मिनिटात पार पडली. विषय पत्रिकेवरील विषयांना वाचन करण्यापूर्वी अभिनंदनाचे ठराव मांडण्यापूर्वी समिती आणि पाटील गटाने बॅनर हाती घेत जोरदार घोषणा द्यायला सुरुवात केली. त्यावेळी चेअरमन राजेंद्र घोरपडे यांनी अजेंडय़ावरील विषय सर्वांना मंजूर आहेत का?, असे सात वेळा विचारत हात वर करण्याची विनंती करताच काहींनी हात वर केले तर काहींनी नकार दिला. सभेचा समारोप करण्यात आला. दरम्यान, सात वर्षात सभासंदाना 10 टक्के डिव्हीडंट वाटप केल्याचा केल्याचा दावा चेअरमन राजेंद्र घोरपडे यांनी केला. तर समिती आणि शिवाजीराव पाटील गटाने प्रतिसभा घेतली. समितीने कर्जाचा विषय निघताच चेअरमन यांनी सभेतून काढता पाय घेतला असल्याचा आरोप प्रति सभेत घेतला.
शिक्षक बँकेची 75 वी सर्वसाधारण सभा बॅंकेचे चेअरमन राजेंद्र घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली, व्हाईस चेअरमन महेंद्र अवघडे, ज्येष्ट नेते सिद्धेश्वर पुस्तके, संचालक दत्तात्रय कोरडे, मोहन निकम, भगवान धायगुडे, राजकुमार जाधव, चंद्रकांत आखाडे, शंकर जांभळे, ज्ञानेश्वर कांबळे, गणेश तोडकर, राजाराम खाडे, तुकाराम कदम, अनिल शिंदे, वैशाली जगताप, निर्मला बसागरे, बंडोबा शिंदे, सुभाष शेवाळे, किरण यादव, चंद्रकांत मोरे, शिवाजी शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी छगन खाडे यांच्यासह सभासदांच्या उपस्थितीत पार पडली. चेअरमन राजेंद्र घोरपडे यांनी सभा वेळेत सुरु केली. विषयत्रेवरील विषयाचे वाचन करण्यापूर्वी दुखवटय़ाचे ठराव त्यांनी मांडले. त्यांनतर विषयाकडे वळणार तोच खाली बसलेले सभासदातील समितीचे आणि शिवाजीराव पाटील गटाचे सभासद उठले. त्यांनी हातात फलक हाती घेवून निषेध करु लागले. त्यावेळी राजेंद्र घोरपडे यांनी मी तुमच्या प्रश्नांना उत्तर देतो, मी तुमचाच बंधू आहे, शांत रहा, असे आवाहन करत होते. परंतु विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी सुरु झाल्याने घोरपडे यांनी अजेंडय़ावरील विषय मंजूर का?, अशी सहा वेळा विचारणा केली. ज्यांना मंजूर आहेत त्यांनी हात वर करा, असे आवाहन करताच कोणी हात वर केले तर कोणी खालीच ठेवले. त्यामध्येच शेवटची सभा संपल्याचे जाहीर करण्यात आले.
सात वर्षात 10 टक्के डिव्हीडंटचे वाटप
बँकेच्या पाचही चेअरमननी आतापर्यंत योगदान दिले आहे. त्यांचा सत्कार संचालक मंडळांकडून घेण्यात आला. सर्वांच्या मार्गदर्शनखाली बँकेचा कारभार चांगला सुरु आहे. आमचे मार्गदर्शक सिद्धेश्वर पुस्तके यांच्या मार्गदर्शनाखाली तिन्ही टप्यावर तिन्ही वर्गाला खुश ठेवण्यात यश आले आहे. सलग सात वर्ष दहा टक्के डिव्हीडंट देणारी महाराष्ट्रातील एकमेव बँक आहे. सर्व सभासद कर्जदारांना फायदा व्हावा म्हणून 14 वेळा व्याजदर कमी केलेले आहे. धाडसी निर्णय घेताना सर्वांना विचारात घेतले जाते. पूर्वी पतीलाच फक्त 10 हजार रुपयांची वैद्यकीय मदत मिळू शकत होती. आमच्या प्रयत्नामुळे 1 लाखापर्यंत पतपत्नीला वैद्यकीय मदत दिली जाते. कोरोना काळात 304 कोटी 75 लाख कोरोना काळात सभासदांना दिलेले आहेत. तसेच कोरोना काळात ज्यांना कोरोना झाला त्यांना 20 हजार जाग्यावर मदत दिली आहे. होम आयसोलेशनमध्ये होते त्यांना 5 हजार मदत दिली आहे. गतवेळी डिव्हिडंड पंतप्रधानांच्या निर्णयामुळे इमारत निधीमध्ये वर्ग करायला लावला होता. त्यामुळे तो देता आला नव्हता. आता हा डिव्हीडंड सभासदांना मिळणे फार गरजेचे होते. सभासदांच्या खात्यात जमा होइं&ल. उद्या त्यांना काढता येईल. इतर जिह्यातील बँका आपल्या बँकेचा आदर्श घेत आहेत. बॅकेच्या सभेत सभासदांच्या हिताचे निर्णय घेण्या आले, असे चेअरमन राजेंद्र घोरपडे यांनी सांगितले.
कर्जाचा विषय निघताच चेअरमनने सभेतून काढला पळ
शिक्षक समितीने सभा संपल्यानंतर तेथेच बाजूला असलेल्या मंदिरात प्रति सभा घेतली. या सभेत समितीच्या नेत्यांनी सताधाऱयांच्यावर बँकेतील भ्रष्टाचाराचे, चेअरमन यांच्या अनियमित कर्जाचे, बोगस कर्ज प्रकरण असे अनेक मुद्दे शिक्षक समितीने लावून धरल्याने प्रश्नांची उत्तरे देऊ न शकलेले व हतबल झालेले चेअरमन यांना दहा मिनिटात सभा संपल्याचे जाहीर करून पळावे लागले, असा आरोप केला. यावेळी राज्याध्यक्ष उदय शिंदे यांनी कार्यकर्त्यांचे प्रबोधन केले. जिल्हाध्यक्ष विश्वंभर रणनवरे यांनी भ्रष्टाचाराचे अनेक मुद्दे वार्षिक प्रतिसभेत विचारल्याबद्दल शिक्षक समितीच्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष शंकरराव देवरे, माजी चेअरमन विश्वास चव्हाण, विठ्ठल माने, प्रदीप कदम, विठ्ठल फडतरे, सतीश नलवडे, संजय नांगरे, उदय नाळे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुरेन्द्र कुमार घाडगे, गजानन वारागडे, अनिल पिसाळ आदी असे शिक्षक समितीचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवाजीराव पाटील गटाने केला प्रतिसभेत ठराव
शिक्षक संघाच्या शिवाजीराव पाटील गटानेही लगेच लॉनमध्येच प्रतिसभा घेतली. त्या सभेत राज्याचे पदाधिकारी तुकाराम कदम, प्रदेश पदाधिकारी प्रदीक घाडगे, जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र ढमाळ, सुंगधराव जगदाळे, बाळासाहेब साळुंखे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी येवू घातलेल्या निवडणूकीत तिन नेत्यांना निर्णय घेण्याचे सर्वाधिकारी देण्यात आल्याचा ठराव मांडला. लबाडांशी युती केल्यास आमचा आताच रामराम घ्यावा, असे काहींनी मत व्यक्त केले.
नुसताच रस्सा अन् पुऱया वाटणीला
मोरया लॉन्सवर घेण्यात आलेल्याला शिक्षक बँकेच्या सभेला शिक्षक सभासदांनी मोठी गर्दी दोन वर्षानंतर प्रत्यक्ष सभा होत असल्याने सभासद गाडय़ा करुन आले होते. सभा संपल्यानंतर आलेल्या सभासदांना जेवणांचे सोय बेँकेच्यावतीने करण्यात आली होती. सभासदांची संख्या जास्त असल्याने पहिल्याच पंगतीला तुटवडा जाणवला. स्वतः बॅकेचे कर्मचारी जेवण वाढत होते. तर चेअरमन स्वतः कोणाला कमी काय पडू नये याची काळजी घेत होते. परंतु पहिल्याच पंगतीला काहींना नुसता रस्सा अन् पुऱया वाटणीला आल्याचे समितीच्या शिक्षकांनी सांगितले.
प्राथमिक शिक्षक संघाचा शिक्षक बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेतून सभात्याग
वार्षिक सर्वसाधारण सभेत झालेला गोंधळ तसेच बँकेत चालू असलेल्या चुकीच्या गोष्टीमुळे सातारा जिल्हा प्राथामिक शिक्षक संघातर्फे सभात्याग करण्यात आल्याची माहिती जिल्हा संघाचे अध्यक्ष चंद्रकांत यादव यांनी दिली.








