प्रतिनिधी / कोल्हापूर
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी देशात या सरकारला ठाकरे सराकार म्हणून संबोधले जाते. मुख्यमंत्री या नात्याने आघाडीचे नेतृत्व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करत आहेत. पदवीधर, शिक्षक आमदार निवडणुकीसाठी पुणे पदवीधर मतदार संघातून मित्रपक्ष काँग्रेस, राष्ट्रवादीचे उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेनेचे उमेदवार नसले तरी या निवडणुकीचे नेतृत्व शिवसेना करत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या विजयासाठी कामाला लागा, असे आवाहन गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी पदाधिकारी व कार्यकर्ते यांना केले.
पदवीधर, शिक्षक आमदार निवडणुकीच्या प्रचारार्थ रविवारी दसरा चौक परिसरातील दिगंबर जैन बोर्डिंग येथे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेनेचा पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा झाला. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. मेळाव्याला खासदार धैर्यशील माने, खासदार प्रा. संजय मंडलिक प्रमुख उपस्थित होते.
गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई म्हणाले, यापुर्वीच्या निवडणुकीत शिवसेना युतीधर्माचे पालन करत भाजपच्या पाठीशी राहिली आहे. मात्र सध्याची परिस्थिती वेगळी आहे. महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर शिवसेना राज्याचे नेतृत्व करत आहे. त्यामुळे या निवडणुकीत शिवसैनिकांची जबाबदारी वाढली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना बळ देण्यासाठी पुणे मतदार संघातील महाविकास आघाडीचे हे दोनही उमेदवार विजय होणे गरजेचे आहे. यासाठी प्रचाराचे सुक्ष्म नियोजन करा. जिल्हाप्रमुखांपासून शाखाप्रमुखांपर्यंत सर्वांनी एकमेकांशी समन्वय राखून मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करा. प्रचारासाठी वेळ कमी आहे. त्यामुळे आत्तापासूनच कामाला लागा. मतदाना दिवशी एका मतदाराकडे तीन, चार वेळा फेऱया मारायला लागल्या तर मारा, मात्र त्याला मतदान करण्यासाठी घेवून या. मतदानाची टक्केवारी आपल्याला वाढवायची आहे, असे गृहराज्यमंत्री देसाई यांनी सांगितले.
खासदार प्रा. संजय मंडलिक म्हणाले, मागील निवडणुकीत शिवसेनेची भुमिका निर्णायक ठरली आहे. यंदाच्या निवडणुकीतही आपल्याला जोमाने काम करायचे आहे. मतदानाची तारीख जवळ येत आहे. त्यामुळे उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहचविण्यासाठी तालुका स्तरावर मेळावे आयोजित करा. मतदार यादी लवकरच मिळेल. यादीच्या अभ्यास करुन प्रत्येक मतदारापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न शिवसैनिकांना करायचा आहे, असे आवाहन खासदार मंडलिक यांनी केले.
आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, पूणे पदवीधर मतदारसंघात शिवसेना यापुर्वी सहकार्याच्या भुमिकेत होते. मात्र सध्या राज्याचे नेतृत्व शिवसेनेचे असल्याने या निवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळवून देणे हि प्रत्येक शिवसैनिकाची जबाबदारी आहे. त्यामुळे या निवडणूकीत पूर्ण ताकदीनिशी उतरुन महाविकास आघाडीला यश प्राप्त करुन देण्याचे आवाहन आमदार आबिटकर यांनी केले.
माजी आमदार सत्यजित पाटील म्हणाले, या निवडणुकीचे मतदार पाच जिल्हÎातील असल्याने केवळ सभा, मेळावे घेवून चालणार नाही. याबरोबर मतदारांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे. निवडणुकीबाबत मतदारांमध्ये जनजागृती करा. मतदारांना मतदान केंद्रा पर्यंत घेवून या. शिवसेनेचा उमेदवार नाही म्हणून गाफील राहू नका. महाविकास आघाडीच्या उमेदवाराला प्रथम क्रमांकाची मते मिळवून देण्यासाठी गतीमान व्हा, असे आवाहन माजी आमदार पाटील यांनी केले.
मेळाव्याला शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, मुरलीधर जाधव, शहरप्रमुख शिवाजीराव जाधव, सुनील मोदी, युवासेनेचे हर्षल सुर्वे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख मंगल चव्हाण, शुभांगी पोवार आदींसह अन्य पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.









