शिक्षण खाते – जिल्हाधिकाऱयांत गोंधळ : ऐन परीक्षांच्या काळात विद्यालयांवर दडपण
प्रतिनिधी /पणजी
विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून जिल्हाधिकाऱयांनी आदेश जारी करून काल शुक्रवार 10 डिसेंबरपासून शिक्षकांना निवडणूक प्रशिक्षणास बोलावल्याने त्याचा परिणाम म्हणून काल काही शाळा अक्षरशः शिक्षकांविना ओस पडल्या. प्यून, स्विपर आणि प्रशासकीय कर्मचारीवर्गाची मदत घेण्याची पाळी आली. दुसऱया बाजूने भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवासाठीही विद्यार्थ्यांना घेऊन येण्यास सांगण्यात आले, मात्र त्यासाठीही शिक्षक नसल्याने अखेर पालक शिक्षक संघाच्या सदस्यांना विद्यार्थ्यांच्याबरोबर जावे लागले. या प्रकारावरुन निवडणूक आयोगाला विद्यार्थ्यांच्या भवितव्याची चिंता नसून फक्त राजकारण्यांचेच पडलेले आहे, अशी टीका होत आहे.
मुख्याध्यापकांसह सर्वानाच प्रशिक्षणात जुंपले
या महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात विधानसभा निवडणुका जाहीर होणार अशी चूणचूण लागताच सर्व शाळांकडून सर्व शिक्षकांची नावे मागवण्यात आली. यापूर्वी शिक्षकांना निवडणूक प्रशिक्षण देताना प्रत्येक शाळेतील 20 टक्के शिक्षकांना बोलविले जायचे, पण यंदा मुख्यध्यापकासह सर्व शिक्षकांना बोलावण्यात आले आहे. शुक्रवार दि. 10 डिसेंबर हा प्रशिक्षणाचा पहिला दिवस होता. काही शाळांना तर प्रशिक्षणाचे पत्र जिल्हाधिकाऱयांच्या कार्यालयातून शुक्रवारीच मिळाले.
हजर न राहिल्यास शिस्तभंगाची कारवाई
प्रशिक्षणाला हजर न राहिल्यास निवडणूक कायद्याखाली शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, अशी धमकीही त्या पत्रकातून देण्यात आल्याने शाळेचे सर्व कामकाज बाजूला ठेवून शिक्षक प्रशिक्षणासाठी धावले. त्यामुळे शाळा शिक्षकांविना ओस पडल्या. शालांत मंडळाच्या दहावीच्या, तसेच बारावीच्या परीक्षा चालू आहेत. दुसऱया बाजूने सातवी, आठवी व नववीचे वर्गही घ्यायचे आहेत हे लक्षात न घेता एकाच शाळेतील सर्व शिक्षकांना प्रशिक्षणासाठी बोलविण्यात आल्याने काही शाळांमध्ये शुक्रवारी सावळा गोंधळ माजला. शाळेचे कामकाज शेवटी प्रशासकीय कर्मचारी, प्यून आणि स्वीपरच्या मदतीने पार पाडावे लागले.
शाळांतील सांस्कृतिक कार्यक्रम ठप्प
गोवा मुक्तीचा यंदा हिरक महोत्सव साजरा केला जात आहे. 19 डिसेंबरच्या तयारीसाठी शाळा गुंतल्या आहेत, अशा वेळी कला आणि संस्कृती खात्याने शाळांमध्ये पाठवलेले हार्मोनियम व तबला प्रशिक्षक गायब झाले आहेत. कारण त्य़ा सर्वांना 31 डिसेंबरपर्यंत कोविड डय़ुटीवर पाठविण्यात आले आहे. शाळांमधील सांस्कृतिक कार्यक्रम सध्या ठप्प पडले असून मुख्याध्यापकांनी तसे पत्रही कला व संस्कृती खात्याला पाठवले आहे.
जिल्हाधिकारी म्हणतात चूक सुधारू
यापूर्वी प्रत्येक शाळेतील रोज 20 टक्के शिक्षकांना प्रशिक्षणासाठी बोलावले जायचे, यंदा वेळेची मर्यादा पहाता 80 टक्के शिक्षकांना बोलविण्यात आले आहे. कुठल्याच शाळेतील 100 टक्के शिक्षकवर्ग बोलविण्यात आलेला नाही. तसे झाले असल्यास त्या शाळेने शिक्षण खात्याकडे रितसर तक्रार करावी, शिक्षण संचालकांनी त्वरित जिल्हाधिकाऱयांच्या नजरेस आणून दिल्यास लगेच चूक सुधारली जाईल, असे जिल्हाधिकाऱयांच्या कार्यालयातून सांगण्यात आले आहे.
शिक्षण खाते – जिल्हाधिकाऱयांत सावळागोंधळ
शिक्षकांना शिक्षणाच्या कामाव्यतिरिक्त दुसरे काम देता येत नाही, पण या कायद्याला अपवाद असून निवडणूक कार्य, जनगणना आणि आपत्कालीन सेवेत शिक्षकांना पाचारण केले जाऊ शकते. निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रम शिक्षादानाच्या शाळेच्या कामात अडथळा ठरत आहे. दोन्ही खात्यात कोणताच ताळमेळ नसल्याने हा सावळ गोंधळ सुरु झाला आहे.
विज्ञान महोत्सवात नेण्याची जबाबदारी पालकांवर
आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवात विद्यार्थ्यांना घेऊन शिक्षकांनी कांपाल पणजी येथे यावे, असा आदेश सर्व शाळांना पाठवण्यात आला आहे. या तीन दिवसात 10 हजार विद्यार्थी अपेक्षित आहेत. तीन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड स्थापन करण्याचा या महोत्सवाचा हेतू आहे. शिक्षकांना निवडणूक प्रशिक्षण डय़ूटी देण्यात आल्याने आता पालक शिक्षक संघातील पदाधिकाऱयांना विद्यार्थ्यांना घेऊन विज्ञान महोत्सवात जाण्याची पाळी आली आहे.









