प्रतिनिधी/ बेळगाव
शिक्षकांची शाळा सुरू झाली असून निष्ठाअंतर्गत 3 नोव्हेंबरपासून शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांनादेखील दररोज ऑनलाईन शिक्षणाचा लाभ घ्यावा लागणार आहे. कोरोनाचा संसर्ग कमी होत असताना शाळा केव्हा सुरू होणार हा विषय चर्चेत आहे. मात्र, बदलत्या शिक्षण पद्धतीनुसार शिक्षकांना मंगळवारपासून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. एनसीईआरटी व डीएसईआरटी यांच्यातर्फे सदर प्रशिक्षण आयोजित करण्यात आले असून दररोज दोन तास ऑनलाईन प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे.
सरकारी प्राथमिक शाळांसाठी सदर प्रशिक्षण सक्तीचे असून इ. 1 ते 8 वीच्या शिक्षकांना याचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याअंतर्गत 18 मॉडेल कोर्सचे मार्गदर्शन करण्यात येणार असून प्रत्येकी तीन तीन मॉडेल कोर्सचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. कन्नड व इंग्रजी भाषेत सदर मॉडेल कोर्स उपलब्ध आहेत. प्रत्येक कोर्स पूर्ण झाल्यानंतर प्रश्न तसेच कोडे सोडवणे गरजेचे आहे. एक मॉडेल पूर्ण होताच याबाबतचे सर्टिफिकेट देण्यात येणार आहे.
प्रशिक्षण कालावधी 3 नोव्हेंबर ते 15 फेब्रुवारी
शिक्षकांना अध्यापनासाठी उपयुक्त ठरणाऱया प्रशिक्षणाचा कालावधी तीन महिन्यांचा असून 3 नोव्हेंबर ते 15 फेब्रुवारी दरम्यानचे प्रत्येकी तीन तीन मॉडेलचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. प्रशिक्षणासाठी दिशा ऍपची मदत होणार आहे. 3 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर, 16 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर, 1 डिसेंबर ते 15 डिसेंबर, 16 डिसेंबर ते 31 डिसेंबर, 1 जानेवारी ते 15 जानेवारी, 16 जानेवारी ते 31 जानेवारी व 1 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी अशी सात टप्प्यात प्रत्येकी तीन याप्रमाणे 18 मॉडेल्सच्या प्रशिक्षणाची विभागणी करण्यात आली आहे. यामुळे शिक्षकांसाठी शिक्षणाच्या प्राथमिक टप्प्यापासून तंत्रज्ञानातून शिक्षण याबाबतची सविस्तर माहिती प्रशिक्षणातून अनुभवायला मिळणार आहे.









