उच्चशिक्षणमंत्र्यांवर प्रश्नांचा भडिमार
बेळगाव : प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागातील अनेक जागा रिक्त झाल्या आहेत. 2015 पासून जागा भरल्या गेल्या नाहीत. कोरोनाचे कारण पुढे करून जागा भरण्यास टाळाटाळ केली गेली आहे. त्याविरोधात विधानपरिषद सदस्य अरुण शहापूर, पुट्टण्णा, श्रीकंठगौडा यांनी जोरदार आवाज उठविला. त्यामुळे विधानपरिषदेमध्ये काहीवेळ गोंधळ उडाला. मात्र, विधानपरिषद सभापती बसवराज होरट्टी यांनी तातडीने याबाबत मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेऊन ही समस्या सोडविण्याची सूचना उच्चशिक्षणमंत्री अश्वत्थ नारायण यांना केली. प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक नसल्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अनेक जण बेरोजगार झाले आहेत. शिक्षण घेऊनही ते बेरोजगार आहेत. अनुदानित खासगी शिक्षण संस्थांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून जागा भरल्या गेल्या नाहीत. त्या भरण्यास मुभा देण्यात आलेली नाही. याचबरोबर सरकारी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्येही जागा भरल्या गेल्या नाहीत. त्या जागा तातडीने भराव्यात, अशी मागणी करण्यात आली. यावर उच्चशिक्षणमंत्री अश्वत्थ नारायण यांनी सरकारने याबाबत निर्णय घेतला आहे. मात्र अजून यासाठी आर्थिक तरतूद झाली नसल्याने अर्थ विभागाकडूनच हिरवाकंदील मिळाला नाही. अर्थ विभागाकडून योग्य माहिती मिळाल्यानंतर निश्चितच त्या जागा भरल्या जातील, असे त्यांनी सांगितले. यावर अरुण शहापूर यांनी हा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. यावर सभागृहामध्ये सर्व ती चर्चा होणे गरजेचे आहे. त्यासाठी स्वतंत्र वेळ द्यावा, अशी मागणी केली. त्यावर सभापती बसवराज होरट्टी यांनी निश्चितच यासाठी वेळ दिला जाईल, असे सांगितले.









