कोंडी, मायणा – केपे येथील घटना
वार्ताहर/ केपे
कोंडी-मायणा, केपे येथील वासू गावकर (35) हा शिकारीसाठी गेल्यावेळी तयार केलेल्या कृत्रिम बंदुकीची गोळी पायाला लागून तो जखमी होण्याची घटना घडली. त्याला उपचारांकरिता नेत असताना त्याचा मृत्यू झाला. यासंबंधी सांगेचे आमदार प्रसाद गावकर व अन्य ग्रामस्थांनी केपे पोलीस स्थानकावर जाऊन 24 तासांत गुन्हा नोंद करावा तसेच त्याच्यासोबत असलेल्या साथीदाराला अटक करावी अशी मागणी केल्यानंतर केपे पोलिसानी दत्तराज पडियार याला अटक केली. या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या 304 कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे.
कोंडी-पिर्ला येथे राहणारा वासू गावकर हा खनिज खाणीवर ट्रकचालक होता. कामावरून आल्यानंतर बुधवारी संध्याकाळी 7 च्या सुमारास दत्तराज पडियार याच्यासोबत तो कोंडी येथील रस्त्यावरून काही अंतरावर वनात गेला होता. तिथे रानटी जनावरांची शिकार करण्याकरिता कृत्रिम बंदूक तयार करून दोरीच्या मदतीने जनावरे जात असलेल्या वाटेवर बसवत असताना गोळी सुटून ती वासू याच्या मांडीला लागली. त्यामुळे तो रक्तबंबाळ होऊन पडला. बरेच रक्त वाहून गेल्याने काही वेळेनंतर त्याला केपे आरोग्य पेंद्रात उपचारांकरिता नेले असता त्याचा मुत्यू झाला.
वेळेत उपचारांकरिता न नेल्याने मृत्यू झाल्याचा दावा
मात वासू हा दत्तराज पडियार व इतर साथीदारासोबत वनात गेला होता. तेथे तयार केलेल्या बंदुकीची गोळी त्याच्या पायाला लागली. मात्र गाव जवळ असूनही साथीदारांनी त्याला उपचारांकरिता नेण्यास खूप वेळ काढला. या काळात खूपच रक्तस्राव झाल्याने त्याचा मुत्यू झाला. जर वेळेत त्याला उपचारांकरिता नेले असते, तर तो वाचूही शकला असता, असा दावा आमदार गावकर यांनी केला. या प्रकरणी पोलिसांनी राजकीय दबावाला न जुमानता गुन्हा नोंद करावा व यात गुंतलेल्यांना 24 तासात अटक करावी, अशी मागणी करत त्यांनी व ग्रामस्थांनी केपे पोलीस स्थानकावर ठाण मांडले. केपेचे निरीक्षक दीपक पेडणेकर यांनी त्यांना शवचिकित्सा अहवाल आल्यावर आवश्यक कायदेशीर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले आणि कोणीही कायदा हाती घेऊ नये असे सांगितले .
कडक कारवाई करण्याची मागणी
बुधवारी रात्री 11 च्या दरम्यान या घटनेची माहिती मिळाली. त्यावेळी गावठी बाँबने मुत्यू झाल्याची अफवा पसरली होती. मात्र गुरुवारी सकाळी ग्रामस्थांकडून जी माहिती मिळाली त्यानुसार त्याला बंदुकीची गोळी लागली होती. वासू याला दोन लहान मुले असून तरुण वयात असा प्रसंग ओढवणे हे दुःखदायक आहे. ही घटना जेथे घडली ती जागा गावापासून जास्त दूर नव्हती. त्यामुळे गावातून कोणीही मदतीला आले असते. मात्र तसे न करता खूपच वेळ जखमी वासूला तसेच ठेवल्याने व वेळेवर तो इस्पितळात पोहोचू शकल्याने मृत्यू येण्याची दुर्दैवी घटना घडली, असा दावा आमदार गावकर यांनी केला. तसेच आता निवडणूक तोंडावर आलेली आहे. अशा वेळी बंदुका पोलीस स्थानकात ठेवल्या जातात. मात्र अशा प्रकारच्या घटनेमुळे कायद्याचे किती पालन होते हा प्रश्न तयार होतो. यासंदर्भात कडक कारवाई करण्यात यावी. हा विषय फक्त मयत व्यक्तीच्या कुटुंबाचा नसून संपूर्ण गावचा आहे, असेही त्यांनी सांगितले.
त्यानंतर वासूचा मृतदेह शवचिकित्सेकरिता पाठविण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना बुधवारी रात्री सातच्या दरम्यान घडली होती, तर केपे पोलिसांना 7.45 च्या दरम्यान त्याची माहिती मिळाली. या प्रकरणी वासूचा एक साथीदार दत्तराज पडियार (मायणा) याला केपे पोलिसांनी अटक केली असून शिकारीकरिता वापरण्यात आलेले सर्व साहित्यही जप्त करण्यात आले आहे. निरीक्षक दीपक पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालू आहे. यात आणखी किती जणांचा समावेश आहे त्याचाही तपास पोलीस करत आहेत.









