कारिवडेत युवकाचा मृत्यू, बंदुकीचा स्फोट
सावंतवाडी
सावंतवाडीनजीक कारिवडे येथील जंगलात शिकार करण्यासाठी गेलेल्या युवकाचा बंदुकीने पेट घेतल्याने स्फोट होऊन मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. अभिजीत रामचंद्र पोकळे (28, रा. कारिवडे-गावठणवाडी) असे या युवकाचे नाव आहे. मृत अभिजीतच्या हृदय, आतडे आदी भागात बंदुकीतील 20 छरे घुसले होते. त्यातील दहा छरे शवविच्छेदन करताना बाहेर काढण्यात आले. अतिरक्तस्राव झाल्याने मृत्यू झाल्याचे निदान डॉ. अभिजीत चितारी यांनी केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कारिवडे-गावठणवाडी येथील अभिजीत पोकळे याला शिकारीचा नाद होता. शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास अभिजीत हा बंदूक घेऊन घरापासून तीन कि. मी. अंतर असलेल्या जंगलात शिकारीला गेला होता, अशी माहिती त्याचा भाऊ एकनाथ याने दिली. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास अभिजीत हा उजव्या हाताच्या अंगठय़ाकडे जखमी होऊन रक्तबंबाळ अवस्थेत घरी आला. त्याने घरच्यांना आपणास उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जा, असे सांगितले. त्यानंतर तो बेशुद्ध झाला. त्याला घरच्यांनी तात्काळ सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे, पोलीस कर्मचारी बाबी देसाई यांच्यासह जि. प. सदस्य मायकल डिसोजा, भाजप तालुकाध्यक्ष महेश सारंग, पं. स. सदस्या प्राजक्ता केळुसकर, सरपंच अपर्णा तळवणेकर, पोलीस पाटील प्रदीप केळुसकर, मंगेश तळवणेकर, अशोक माळकर यांनी रुग्णालयात धाव घेतली.
रुग्णालयात डॉ. अभिजीत चितारी, डॉ. मुरली चव्हाण यांनी शवविच्छेदन केले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. छरे लागून अतिरक्तस्राव झाल्याने मृत्यू झाल्याचे प्राथमिक निदान डॉ. चितारी यांनी केले. मात्र, व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे.
मृत्यूविषयी संशय नाही
अभिजीतला रात्रीच्यावेळी शिकारीला जाण्याची सवय होती. शनिवारी रात्री तो धापा टाकत घरी आला. त्यावेळी त्याच्या हाताचा अंगठा रक्तबंबाळ दिसत होता. ‘बंदूक अचानक पेटून मार बसला. मला दवाखान्यात ने’, असे त्याने सांगितले. मात्र, उपचारासाठी सावंतवाडीत नेत असताना अभिजीत मृत झाल्याचे डॉक्टरनी घोषित केले, अशी फिर्याद त्याचा भाऊ एकनाथ याने पोलीस ठाण्यात दिली. त्याच्या मृत्यूबाबत कोणावरही संशय नसल्याचे त्याने पोलिसांना सांगितले, अशी माहिती सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे यांनी दिली.
अभिजीतच्या मृतदेहाचे विच्छेदन करण्यात आले. मात्र, नेमका मृत्यू कशामुळे झाला, याचे निदान होण्यासाठी व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. अभिजीत शिकारीसाठी कुठे गेला होता?, त्याने कोणती बंदूक वापरली?, ती कोणाच्या मालकीची आहे, याचा तपास केला जाणार आहे, असे लोहकरे यांनी सांगितले.
अभिजीत याचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय
अभिजीत याची घरची परिस्थिती गरिबीची आहे. काही वर्षांपासून त्याने स्वत:चा फॅब्रिकेशनचा व्यवसाय घरीच सुरू केला होता. उत्कृष्ट कारागिर म्हणून तो परिचित होता. व्यवसायातून त्याने ओळख निर्माण केली. सामाजिक कार्यातही तो पुढे असायचा. त्याला क्रिकेटचीही आवड होती. त्याचा भाऊ एकनाथ याचे इन्सुली येथे गॅरेज आहे. अभिजीतच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.









