१० वाघर, ४ दुचाकी व मिनी टेंपोसह ४.४६ लाखांचा मुद्देमाल जप्त
प्रतिनिधी/नागठाणे
सातारा वनविभागाने धडाकेबाज कारवाई करत पाडळी(ता.सातारा) येथे शिकारीसाठी आलेल्या मोठ्या शिकारी टोळीला जेरबंद केले.वनविभागाने या प्रकरणी १२ शिकाऱ्यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून सुमारे ९०० मीटर लांबीच्या १० वाघरा,५० लाकडी काठ्या,४ दुचाकी व १ छोटा हत्ती मिनी टेंपो असा सुमारे ४.४६ लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
वनविभागाच्या आजवरच्या कारवाईतील ही सर्वात मोठी कारवाई असून या शिकाऱ्यांनी सातारा तालुक्यासह महाबळेश्वर,पाटण,कोयना विभागात मोठ्या प्रमाणावर शिकार केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
याबाबत वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार पाडळी (ता.सातारा) गावच्या हद्दीत शिंदे वस्ती परिसरात शिकाऱ्यांची मोठी टोळी आल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल राठोड व परळी विभागाचे वनपरिमंडल अधिकारी योगेश गावित यांना मंगळवारी मिळाली.या माहितीच्या अनुषंगाने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी खास दोन पथके तयार करून पाडळी गावाच्या हद्दीत शिकारीसाठी आलेल्या टोळीला घेरा घातला.वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना पाहताच त्यांनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला.मात्र कर्मचाऱ्यांनी शिताफीने १२ जणांच्या या संपूर्ण टोळीला ताब्यात घेतले.

दत्तात्रय विजय पाटील (वय.३३,रा.हरपळवाडी, ता.कराड),आकाश गणेश आवळे (वय.२३,रा.अतीत,ता सातारा),तुषार अंकुश काळे (वय.२५,रा.अतीत.ता.सातारा),अमर राजकुमार काळे (वय.२५,रा.नागठाणे,ता.सातारा),विशाल बबन भिंगारे (वय.२३,रा इंदोली,ता.कराड),मंगेश संजय जाधव (वय,२४,रा.नागठाणे, ता.सातारा), सयाजी भिकू मदने (वय,३३, रा.इंदोली, ता.कराड), श्रीमंत रामचंद्र गायकवाड(वय,२५, रा.अतीत,ता.सातारा), चैतन सुनील काळे (वय.२२,रा.नागठाणे, ता.सातारा), सोमनाथ एकनाथ काळे (वय.३०,रा.नागठाणे,ता.सातारा), अजित श्रीरंग जाधव (वय.३६,रा,किवळ, ता.कराड) व गणेश चव्हाण (वय.२९, रा.अतीत, ता.सातारा) अशी वनविभागाने ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.
त्यांच्याकडे अधिक चौकशी करता हे सर्व शिकार करण्यात माहीर असल्याचे व ज्या गावातील शेतकऱ्यांच्या
शिवारात वन्य प्राणी असल्याचे समजल्यावर तेथे जाऊन शेताला चारही बाजूने वाघरी लावून शिकार करत असल्याची माहिती समोर आली आहे. या टोळीने सातारा तालुक्यासह महाबळेश्वर,पाटण, कोयना भागातही शिकारी केल्या असल्याचा संशय वनविभागाला आहे.त्यांच्याकडून शिकारीसाठी लागणाऱ्या १० मोठ्या वाघरी, ५० लाकडी काठ्या,४ दुचाकी व १ छोटा हत्ती मिनी टेंपो असा मोठा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. ही कारवाई सातारा उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा व सहाय्यक वनसंरक्षक विश्वास भडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल राठोड, परळी वनपरिमंडल अधिकारी योगेश गावित,सुहास भोसले, वनसंरक्षक राज मोसलागीं, महेश सोनावले, रणजित काकडे, संतोष काळे व मारुती माने यांनी केली.








