एनएसयूआयचे अध्यक्ष नौशाद चौधरी यांची मागणी
प्रतिनिधी /पणजी
गोव्यात कोरोनाची रुग्णसंख्या मोठय़ा पटीने वाढत असल्यामुळे तिसऱया लाटेचा धोका निर्माण झाला असून राज्य सरकारने शाळा, कॉलेज व शिक्षण संस्था बंद करुन शिकवणी वर्ग आणि परीक्षा ऑनलाईन घेण्याची मागणी एनएसयूआयच्या गोवा शाखेने केली आहे. मागणी मान्य न झाल्यास उच्च शिक्षण संचालक तसेच गोवा विद्यापीठ उपकुलगुरुंना घेराव घालण्याचा इशारा एनएसयूआयने दिला आहे.
पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत एनएसयूआयचे अध्यक्ष नौशाद चौधरी यांनी वरील मागणी करुन सांगितले की, तज्ञ समितीने कठोर निर्बंध लागू करण्याची शिफारस सरकारला केली होती. परंतु असंवेदनशील मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यांना प्रचाराचा शुभारंभ करायचा होता व स्वार्थासाठी त्यांनी शिफारशींकडे डोळे झाक केली. त्याचे परिणाम आता दिसू लागले असून कोरोनाची तिसरी लाट आल्याप्रमाणे रुग्ण वाढत आहेत. अशा परिस्थितीत शाळा, कॉलेज चालू ठेवली आणि हजेरीत परीक्षा घेतल्या तर मोठे संकट निर्माण होऊ शकते. म्हणून डॉ. सावंत यांनी विद्यार्थीवर्गाला कोरोनाच्या संकटातून वाचवावे. शाळा, कॉलेज बंद करुन पूर्वीप्रमाणे परीक्षा, शिकवणी वर्ग ऑनलाईन पद्धतीने सुरु करावेत, अशी मागणी चौधरी यांनी केली आहे.
महाराष्ट्र – कर्नाटकात कठोर निर्बंध लागू करण्यात आले असून गोव्याच्या सीमा मात्र खुल्या आहेत. तेथून हजारो लोक गोव्यत ये – जा करीत असून त्यांची तपासणी होत नाही. त्यांच्यावर बंधने नाहीत म्हणूनच हे कोरोनाचे संकट वाढले आहे. ते रोखण्यासाठी सीमेवर कडक तपासणी करावी आणि शाळा, कॉलेज पुन्हा बंद ठेवाव्यात, अशी याचना चौधरी यांनी केली आहे.








