प्रतिनिधी / वाकरे
शिंदेवाडी- खुपिरे (ता. करवीर) येथील एक ४६ वर्षीय पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. हा कर्मचारी सुमारे २० ते २५ लोकांच्या संपर्कात आल्याचे समजते, त्यामुळे त्या सर्वांना शाळेत क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की संबंधित पोलिस कर्मचारी पन्हाळा येथे नोकरीस होता.अलीकडेच त्याची कसबा बावडा येथील पोलीस मुख्यालयात बदली झाली आहे. यापूर्वी केर्ले येथील एक पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आला असुन तो या पोलिस कर्मचाऱ्याचा मेहुना आहे. शिंदेवाडी येथील हा कर्मचारी मेव्हण्याच्या संपर्कात आल्याने त्याला कोरोना झाल्याचे समजते. संबंधित पोलिस कर्मचारी गावातील २० ते २५ लोकांच्या संपर्कात आल्याने संपूर्ण गावात भितीचे वातावरण पसरले आहे. हा कोरोना पॉझिटिव्ह कर्मचारी सीपीआर रुग्णालयात उपचार घेत आहे.त्याच्या संपर्कात आलेल्या ग्रामस्थांनी सोमवारी शासकीय रुग्णालयात स्वब तपासणीसाठी दिला आहे.
दरम्यान शिंदेवाडी येथील पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे समजताच करवीर तालुक्यातील आरोग्य यंत्रणेची धावपळ उडाली असून ती सतर्क झाली आहे. खुपिरे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मीठबावकर यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह शिंदेवाडीस भेट दिली आणि आरोग्य यंत्रणा कामाला लावली आहे.सरपंच सौ. संपदा पाटील,उपसरपंच बळवंत सुतार, ग्रामसेविका शीतल पाटील, तलाठी सौ.बेलेकर,पोलीस पाटील सौ. सविता गुरव, कोतवाल शिवाजी गुरव, सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी गावात औषध फवारणी सुरू केली आहे. दक्षतेचा उपाय म्हणून संबंधित पोलिस कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी दक्षतेचा उपाय म्हणून संबंधित पोलिस कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना प्राथमिक शाळेत क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच गावात तीन दिवस पूर्णपणे लॉक डाउन करण्याचा निर्णय घेतला असून दूध संस्था, सहकारी संस्था, दुकाने आणि अन्य व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.कोरोना शिंदेवाडीसारख्या छोट्या गावात शिरल्याने करवीर तालुक्याच्या पश्चिम भागात भितीचे वातावरण पसरले आहे.
Previous Articleटाटा करणार 40 हजार कर्मचारी भरती
Next Article ‘रिलायन्स’चे समभाग उच्चांकी








