शिक्षक-विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांकडून ‘व्हर्च्युअल’ मार्गदर्शन : शहरी ओढ टाळून गावच्या शाळेतच मुलांना पाठविण्याचे केले आवाहन
प्रतिनिधी/ पणजी
शाळा बंद करणे हा सरकारचा हेतू नाही आणि इच्छाही नाही. परंतु पालकच जर मुलांना शहरी भागातील उच्चभ्रू शाळांमध्ये पाठवू लागले तर ग्रामीण भागातील शाळा चालतील तरी कशा? असा सवाल उपस्थित करत, शाळा बंद पडण्यास खास करून पालकच जबाबदार आहेत, असा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला.
शनिवारी राज्यभरातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी व्हर्च्युअल पद्धतीने संवाद साधताना मुख्यमंत्री बोलत होते. शैक्षणिक मूल्यवर्धन 3.0 कार्यक्रमांतर्गत या संवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी शांतीलाल मुत्था फाऊंडेशनच्या सहकार्याने राबविल्या जाणाऱ्या मूल्याधारित शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. सरकारला शाळा बंद करण्यात रस नाही व आम्ही कोणतीही शाळा बंद केलेली नाही. उलटपक्षी त्यापैकी अनेक शाळांचे नूतनीकरण, दुऊस्ती करून त्यांना स्मार्ट रूप देण्यात आले आहे. प्रत्येक गाव आणि तालुक्यात पायाभूत शिक्षण मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. तरीही पालकांचा ओढा शहरी भागांकडे असल्याने या शाळांमध्ये पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. अशावेळी कठोर निर्णय घेताना काही शाळांचे विलिनीकरण करण्यात आले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
983 प्राथमिक शाळांमध्ये मूल्यवर्धन कार्यक्रम
मूल्यवर्धन कार्यक्रम सध्या 983 प्राथमिक शाळांमध्ये राबविला जात आहे. 71,900 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होत आहे. आकर्षक आणि क्रियाकलाप-आधारित शिक्षण मॉड्यूलद्वारे हा कार्यक्रम न्याय, समानता, प्रामाणिकपणा आणि सहानुभूती यासारख्या मूलभूत तत्त्वांना प्रोत्साहन देतो, एनईपी 2020 आणि एनसीएफ 2023 मार्गदर्शक तत्त्वे वापरून आम्ही केवळ स्मार्ट शाळाच नव्हे तर एक हुशार आणि अधिक प्रगत पिढी घडवत आहोत, असे मुख्यमंत्री म्हणाले.
लवकरच प्रत्येक शाळेत 4 शिक्षक
अनेक प्राथमिक शाळांमध्ये सध्या एक किंवा दोनच शिक्षक आहेत. त्यासाठी सरकारने शिक्षक भरती प्रक्रिया हाती घेतली असून ती पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक शाळेत चार शिक्षक असतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.
बालरथ सुविधेचा गैरवापर टाळा
अन्य एका प्रश्नावर बोलताना त्यांनी बालरथ सुविधा ही जास्तीत जास्त 3 किमी पर्यंतच्या परिघात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आहे. तरीही काही शाळा व्यवस्थापनाकडून 15-20 किमी पर्यंतच्या अंतरावरील भागातील विद्यार्थ्यांना आणण्यासाठीसुद्धा वापरण्यात येत आहेत. हा या सेवेचा गैरवापर आहे. कोणत्याही शाळेने या सुविधेचा गैरवापर करू नये, असे मुख्यमंत्र्यांनी सुचविले.
विद्यार्थ्यांना मारहाण होणे चिंतनीय बाब
हल्लीच्या काळात शाळांमध्ये शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना जबर मारहाण होण्याचे काही प्रकार उघडकीस आले होते, त्यासंबंधी बोलताना मुख्यमंत्र्यांनी अशा घटनांबाबत चिंता व्यक्त केली व संबंधित शिक्षकांविऊद्ध पोलिस तक्रारी करण्यात आल्याचे सांगितले. हे प्रकार टाळण्यासाठी प्रत्येक शिक्षकाने आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याची समज, संयम आणि सर्जनशील क्षमता ओळखण्यावर भर द्यावा, असे आवाहन केले. तसेच त्यासाठी स्वत: शिक्षकांनी मूल्याधारित शिक्षण पद्धती स्वीकारावी, असा सल्ला दिला.









