शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीत घाटगे यांची माहिती
प्रतिनिधी / कोल्हापूर
छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यामार्फत चार ते सहा ऑक्टोबर दरम्यान भव्य मॅटवरील कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले आहे. कोरोना पार्श्वभूमीवर कारखाना इतिहासात प्रथमच प्रेक्षकाशिवाय स्पर्धा होणार आहे. राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त या स्पर्धा टोकियो आलंपिक 2021 च्या धर्तीवर होणार आहेत. कोरोना प्रतिबंधक नियमांचे तंतोतंत पालन करून या स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यात येणार आहेत. स्पर्धेचे हे 35 वे वर्ष आहे. अशी माहिती शाहू गुपचे अध्यक्ष समरजीत घाटगे यांनी पत्रकार बैठकीत दिली.
ते म्हणाले, कारखान्याच्या मालकीच्या बंदिस्त गोदामात या स्पर्धा घेण्यात येतील. त्या ठिकाणी मोजक्याच लोकांना प्रवेश असेल. यामध्ये मल्ल, पंच, वस्ताद व अनुषंगिक स्टाफ यांचा समावेश असेल. प्रेक्षकांना या ठिकाणी प्रवेश नसेल, पण त्यांना या स्पर्धेचा आनंद घेता यावा, यासाठी फेसबुक पेजवरून स्पर्धेचे सर्व दिवसाचे ओनलाइन प्रक्षेपण करण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱया मल्लांना कोरोना चाचणी अहवाल सक्तीचा करण्यात येणार आहे. शिवाय पालकांची लेखी संमतीही आवश्यक राहील. या कुस्ती स्पर्धा 31 विविध गटांमध्ये होणार आहेत. त्यामध्ये 14 वर्षाखालील बाल व 16 वर्षाखालील कुमार गटामध्ये प्रत्येकी आठ गट तसेच 19 वर्षाखालील ज्युनियर सात व सीनियर पाच वजनी गटामध्ये या स्पर्धा होतील. तसेच महिला कुस्तीगिरांसाठी 45, 55 व 65 किलो अशा तीन वजनी गटांमध्ये स्पर्धा घेण्यात येतील. असे घाटगे यांनी सांगितले.
कारखान्याचे संस्थापक विक्रमसिंह घाटगे यांच्या संकल्पनेतून कारखाना कार्यक्षेत्र व कागल तालुक्यातील उद्योन्मुख नवीन खेळाडूंना संधी मिळावी या हेतूने 1984 पासून राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त कारखानामॅटवरील कुस्ती स्पर्धा ऑलिम्पिक पद्धतीने भरवल्या जातात. विविध वजनी गटातील विजेत्या मल्लांना कारखान्यामार्फत शिष्यवृत्तीचे वाटप केले जाते. यातील अनेक खेळाडू राज्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकले आहेत.
या पत्रकार परिषदेसाठी कारखान्याचे व्हाईस चेअरमन अमरसिंह घोरपडे ,संचालक यशवंत तथा बॉबी माने कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण, हिंदकेसरी दीनानाथसिंह, उपमहाराष्ट्र केसरी रामा माने, ऑल इंडिया चॅम्पियन मारुती जाधव, कोल्हापूर महापौर केसरी अमृता भोसले, महाराष्ट्र व महान भारत केसरी अमोल बुचडे, महेश वरुटे, नंदू आबदार, सचिन खोत अमर पाटील, बाळासो मेटकर, नामदेव बल्लाळ, महिला कुस्तीगीर नॅशनल चॅम्पियन सृष्टी भोसले महाराष्ट्र चॅम्पियन अनुष्का भाट माधुरी चव्हाण कारखान्याचे मानधनधारक पैलवान उपस्थीत होते.
हिंदकेसरींच्या मानधनात वाढ करावी- हिंदकेसरी दिनानाथसिंह
राज्य सरकार कुस्तीकडे गांभिर्याने पहात नाही. सध्या हिंदकेसरींना केवळ सहा हजार मानधन दिले जाते. महाराष्ट्र केसरींनाही मर्यादित आनुदान आहे. याचा विचार करुन किमान महिन्याला 20 हजार रुपये मानधन मिळाले पाहीजे अशी मागणी हिंदकेसरी दिनानाथसिंह यांनी केली









