प्रतिनिधी / शाहुवाडी
जिल्ह्यात लॉकडाऊनला शिथीलता मिळाली असली तरी शाहूवाडी तालुक्यात मात्र लॉकडाऊन कायम असल्याचे दिसत असून कंटेनमेंट झोनसह परिसरात कडक संचारबंदीचा अवलंब केला जाणार असून त्याचे कोणी उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येईल असा इशाराही प्रशासनाच्यावतीने देण्यात आला आहे.
शाहूवाडी तालुक्यात उचत येते नऊ एप्रिल ते 12 एप्रिलच्या दरम्यान तीन कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह सापडल्याने तालुक्यात सर्वत्र खळबळ माजली होती. या पार्श्वभूमीवर तालुक्यात सर्वत्रच कडक संचारबंदी अवलंबली होती. त्याबरोबरच उचतसह परिसरातील 10 गावे कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आली आहेत तसेच चार दिवसापूर्वी बांबवडे येथील बाहेरील प्रवासही पॉझिटिव्ह आल्याने बांबवडे येथे ही अतिशय दक्षता घेण्यात आली आहे.
या कंटेनमेंट झोनमधील गावात अत्यावश्यक सेवे व्यतिरिक्त अन्य कुणालाही प्रवेश दिला जात नाही. मात्र चार मे रोजी जिल्ह्यात काही ठिकाणी व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिल्याने शाहूवाडी तालुक्यात ही त्याचे पडसाद उमटले होते. सकाळी मलकापूर शहरात ग्रामीण भागातील नागरिकांची गर्दी झाली होती. मात्र प्रशासनाने त्वरित दखल घेत कंटेनमेंट झोनमध्ये पुढील आदेश येईपर्यंत कोणतेही व्यवहार सुरू करता येणार नसल्याचे जाहीर केल्याने शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर शहरातही पूर्णता लॉकडाऊन आहे तर बांबवडे येथेही 10 मे पर्यंत लॉकडाऊन कायम करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे.