वन्यप्राण्यांचा मोर्चा शहरात : एक होमगार्ड व महिला जखमी
प्रतिनिधी/ सातारा
कडक लॉकडाऊनमुळे रस्ते ओस पडलेत. मात्र, सातारा शहरात आता वन्यप्राण्यांचा वावर वाढू लागला असून येथील शाहूपुरी चौकात रात्री 9 वाजता दोन रानगवे आल्याने बंदोबस्तावरील पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. या धावपळीत एक होमगार्ड पळताना पडून जखमी झाला. रानगवे आल्याची गोष्ट वनविभागाला कळवण्यात आल्याने त्यांनी शोध घेतला मात्र गवे मिळून आले नाहीत. नागरिकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
लॉकडाऊनच्या काळात रस्ते ओस पडलेत. नागरिक देखील घराबाहेर नसल्याने रस्ते एवढे मोकळे अन सुने कसे ? माणसं गेली तरी कोठे ? असा सवाल प्राण्यांना पडू लागला आहे. वन्यप्राण्यांचा मोर्चा आता शहराकडे वळू लागला असून शाहूपुरी चौकात एक रानगवा आला. चौकात पोलीस बंदोबस्तासह थोडी वर्दळ होती. मग तो बिथरला अन सर्वांची पळापळ झाली. काही दुचाकीस्वारांनी तेथून पळ काढला तर गव्यापासून वाचण्याच्या नादात पळणारा होमगार्ड जवान जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
ही बाब वनविभागाला कळवण्यात आल्यानंतर मग वनविभागाची गाडी आली त्यांनी तसेच पोलीस दलाने रानगव्यांना शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र अंधारात ते रानगवे डोंगराच्या दिशेने गेल्याचे सांगण्यात येत होते. वनविभागाने गस्त घालून गवे गेल्याची खात्री केली. दरम्यान, भरवस्तीत एखादा वन्यप्राणी आल्यास घाबरून न जाता कोणीही घराबाहेर न पडू नये. वनविभाग तसेच वन्यप्राणी दक्षता समितीस कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.








