प्रतिनिधी /बेळगाव
मतदानावेळी काही मतदारांच्या सोबत उमेदवाराचे साथीदार मतदान केंद्रामध्ये जात असल्याने यावर आक्षेप घेतल्याने शाहूनगर येथे सकाळच्या सत्रात वादावादीचे प्रकार घडले. शाहूनगर शिवालय परिसरात असणाऱया मतदान केंद्रावर वादावादीचा प्रकार झाल्याने पोलिसांनी मध्यस्थी करत जमावाला हुसकावून लावले.
शाहूनगर व एपीएमसी मार्केट अशा दोन केंद्रांवर शनिवारी चुरशीने मतदान झाले. सकाळपासूनच या मतदान केंद्रांच्या बाहेर मतदारांची मोठी गर्दी झाली होती. एक अंध मतदार मतदानासाठी जात होता. त्याच्या सोबत एका उमेदवाराचा साथीदार असल्याने दुसऱया उमेदवाराने यावर आक्षेप घेतला. यामुळे दोन्ही उमेदवारांच्या समर्थकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. परिस्थिती नियंत्रणात येण्यासाठी पोलिसांनी सर्व नागरिकांना तेथून हुसकावून लावले. परंतु त्यानंतरही वादावादीचे प्रकार सुरूच होते.
पोलिसांची अरेरावी
या मतदान केंद्रांवर पोलिसांच्या सुरू असणाऱया अरेरावीमुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. उमेदवारांनाही पोलिसांच्या या अरेरावीचा सामना करावा लागला. वृत्तांकनासाठी गेलेल्या माध्यम प्रतिनिधींनाही मतदान केंद्रावर जाण्यास परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे या मतदान केंद्रांवर काहीकाळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
ज्योतीनगर येथील 1500 नावे गहाळ
एपीएमसी ज्योतीनगर येथील 1500 हून अधिक मतदारांची नावे मतदारयादीत नसल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला. मतदारयादीत नाव नसल्याने या नागरिकांना मतदानापासून वंचित रहावे लागले. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर तपासणी करूनही मतदान केंद्रच मिळत नसल्याने अनेकांना पुन्हा माघारी फिरावे लागले. मतदारयादीतून नागरिकांची नावे गहाळ झाल्याने त्याची तक्रार आम्ही निवडणूक आयोग तसेच महानगरपालिकेकडे करू, असे उमेदवार वंदना बेळगुंदकर यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.









