बेळगाव : स्मार्ट सिटीअंतर्गत शहर व परिसरात कामांना चालना देण्यात आली आहे. मात्र, अनेक ठिकाणी अर्धवट कामांमुळे नागरिकांची गैरसोय होताना दिसत आहे. असाच प्रकार शाहूनगर येथेही होत आहे. शाहूनगर येथे गटारीचे काम संथगतीने सुरू असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
शाहूनगर येथे गटार बांधकाम व पेव्हर्स घालण्यासाठी खोदाई सुरू करण्यात आली असून मागील पंधरा दिवसांपासून हे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, केवळ खोदाई करून या कामाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. शाहूनगर येथील गणेश चौकपासून गणेश मंदिराकडे जाणाऱया रस्त्यावर ही खोदाई करून ठेवण्यात आली आहे. समोरच बसथांबा असल्यामुळे विद्यार्थी व नागरिकांना थांब्याकडे जाण्यासाठी खोदाई केलेली गटार ओलांडून जावे लागते. अर्धवट काम करण्यात आल्याने मोठी समस्या निर्माण होत आहे. मुख्य रस्त्याकडे जाण्यासाठी नागरिकांना वळसा घालावा लागत आहे. अशी परिस्थिती असताना स्मार्ट सिटीच्या संबंधित अधिकारी व कंत्राटदारांनी याकडे दुर्लक्ष केले असून लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी अनिल नाईक यांनी केली आहे.









