शाहुपूरीकरांची सातारा पालिकेकडे आर्जव : कचरा उचलण्यासाठी दररोज घंटागाडय़ा सुरु करण्याची केली मागणी
प्रतिनिधी / सातारा
शाहुपूरी ग्रामपंचायतीचा सातारा शहरात समावेश झालेला आहे. मात्र, गेल्या चार महिन्यापूर्वी जी कामे मंजूर झाली होती. ती कामे तशीच ठप्प अवस्थेत आहेत. निधी त्या कामावर पडलेला आहे. अभियंता नसल्याने ती कामे करता येत नाहीत. पालिकेने अभियंता देवून ती कामे मार्गी लावावीत, शाहुपुरीतील कचरा नियमित गोळा करण्यासाठी घंटा गाडय़ांची सोय करण्यात अशी विनंती नगराध्यक्षा सौ. माधवी कदम यांच्याकडे शाहुपुरीच्यावतीने माजी पंचायत समितीचे सदस्य संजय जाधव, माजी सरपंच गणेश आरडे, माजी उपसरंच अमित कुलकर्णी यांनी केले.
त्यांनी निवेदन देवून नगराध्यक्षा माधवी कदम यांच्याशी चर्चा केली. संजय पाटील म्हणाले, जेव्हा हद्दवाढ झाली नव्हती. तेव्हा ग्रामपंचायतीने ग्रामपंचायतीच्या चौदाव्या वित्त आयोगातून विविध विकास कामे मंजूर केली आहेत. परंतु ही कामे सध्या ठप्प आहेत. अभियंत्यांनी पाहणी करुन अहवाल दिल्यास ही कामे सुरु राहतील, अशी विनंती केली. तसेच शाहुपूरीत दररोज तयार होणारा कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडी देण्यात यावी. सध्या एक दिवसाआड येत आहे. शाहुपूरी ग्रामपंचायतीच्या मार्फत तीन ट्रक्टर होते. आता सहा घंटागाडय़ा लागतील एकटय़ा शाहुपुरीला तर आकाशवाणी झोपडपट्टीकरता एक घंटागाडी व रस्त्यावरील कचरा गोळा करण्यासाठी एक ट्रक्टर दयावा, अशी विनंती केली. त्यावर नगराध्यक्षा माधवी कदम यांनी मी सुचना देते, कचरा राहणार नाही याची दक्षता घेण्याचे आरोग्य विभागास सुचना देते, तसेच ती कामे पूर्ण करण्यासाठी मुख्याधिकारी अभिजीत बापट यांना बोलते, असे त्यांनी आश्वासन दिले.









