नाट्यगृह सुरू करा या मागणीसाठी बिंदू चौकात प्रातिनिधिक आंदोलन
प्रतिनिधी / कोल्हापूर
`आहे समय बाका ! जाणावा धोका ! आली ही बिकट वेळ ही फार! राजा लहरी नि अंध दरबार! मांडावी कुणापुढे तक्रार !’ हा पोवाडा शाहीर रंगराव पाटील यांनी गावून रंगकर्मींच्या व्यथा सरकारसमोर मांडल्या. बिंदू चौकात रस्त्यावरच रंगकर्मींनी पोवाड्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करून परिसरातील लोकांचे लक्ष वेधले. तसेच दिवसभरात विविध राजकीय नेत्यांची भेट घेवून नाट्यगृह सुरू करण्याची मागणी केली.
सरकारने गर्दी असलेले दुकाने, मॉल, उद्योग, व्यवसाय सुरू केले आहेत. राज्यभर सुरू असलेल्या राजकीय कार्यक्रम आणि निवडणुकांमध्ये तर तोबा गर्दी होत आहे. नाट्यगृहावरच कलाकारांचा उदरनिर्वाह अवलंबून असतो, अशी नाट्यगृह मात्र अद्याप लॉक आहेत. परिणामी रंगकर्मींवर उपासमारीची वेळ आली आहे. परिणामी नाट्यगृह सुरू करा या मागणीसाठी रंगकर्मींनी अनेक आंदोलने केली. तरीही सरकार रंगकर्मींना फक्त आशेचे गाजर दाखवत आहे. त्यामुळे आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून शाहीरी पोवाड्याचे गुरूवारी आयोजन करण्यात आले होते. बाजार, मॉल, विविध निवडणुका आणि राजकीय कार्यक्रमांमध्ये प्रचंड गर्दी होत आहे.
तरी सुध्दा अशा कार्यक्रमांवर सरकार बंदी घालत नाही. परंतू नियमांचे पालन करणाऱया कलाकारांच्या कार्यक्रमावर मात्र सरकार बंदी घालत आहे. कोरोना कालावधीत नाट्यकर्मींवर धुनी-भांडी, हमाली करण्याची वेळ आली आहे. वयोवृध्द कलाकारांना तर कोणी कामावर ठेवून घ्यायलादेखील तयार नाहीत. त्यामुळे भारतीय संस्कृतीचा कणा असलेले बहुतांश कलाकार दोन वेळच्या अन्नाला महाग झाले आहेत. सगळे कार्यक्रम गर्दी करून होतात मग नाट्यगृह का बंद ठेवली आहेत, असा सवाल पोवाड्याच्या माध्यमातून रंगकर्मींनी सरकारला विचारला आहे.
मदत फेरीच्या माध्यमातून मदत निधी गोळा करून सरकारचा निषेध करण्यात आला. शाहीर रंगराव पाटील यांना सर्व कलाकारांनी साथ केली. यावेळी मंजिरी देवण्णावर, महेश सोनुले, मंजिरी जोशी, सतीश आंबर्डेकर, प्रकाश साळोखे, राजू तौंदकर, रमेश सुतार, श्रीधर जाधव, शेखर गुळवणी, समीर भोरे, सुनिल मुसळे आदी कलाकार उपस्थित होते.









