दिल्लीत अराजकता निर्माण होऊ देणार नाही : काँग्रेस-आपकडून मतपेढीचे राजकारण, देशविरोधी घटनांमुळे जनतेत संतापाची भावना
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीतील विधानसभा निवडणुकीकरता स्वतःच्या पहिल्या प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी अरविंद केजरीवाल सरकारवर घणाघाती टीका केली आहे. दिल्लीमधील केंद्र सरकारच्या विकासकामांची यादी मांडत मोदींनी शाहीन बागचा मुद्दा उपस्थित केला आहे. सीलमपूर, जामिया आणि शाहीन बागमध्ये सुरू असलेल्या निदर्शनांना आम आदमी पक्ष आणि काँग्रेसचा कट ठरवत मोदींनी दिल्लीला या अराजकतेत सोडू शकत नसल्याचे म्हटले आहे. या अराजकतेमुळे भविष्यात अन्य मार्ग बंद केला जाऊ शकतो असा इशाराही त्यांनी दिला आहे. सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागितल्याने तसेच बिहारच्या बसेसना दिल्लीत शिरू न देण्याच्या मुद्दय़ावरून केजरीवालांना मोदींनी लक्ष्य केले आहे.
सीलमपूर, जामिया, शाहीन बागमध्ये निदर्शने झाली, ही निदर्शने योगायोग नसून एक ‘प्रयोग’ आहे. यामागील राजकारणाचे स्वरुप राष्ट्राच्या सौहार्दाला धक्का पोहोचविण्याचा हेतू बाळगून आहे. केवळ एका कायद्याला विरोध असता तर सरकारच्या स्पष्टीकरणानंतर तो संपुष्टात आला असता. पण आम आदमी पक्ष आणि काँग्रेस राजकीय खेळ करत असून आता सर्व गोष्टी उघड होत आहेत. राज्यघटना आणि तिरंगा समोर ठेवून ‘ज्ञान’ पाजळत खऱया कटापासून लक्ष हटविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप मोदींनी केला आहे. मतपेढीच्या राजकारणामुळे काँग्रेस आणि आप याप्रकरणी मौन बाळगून आहेत. पण हे राजकारण पाहून दिल्लीचा नागरिक संतप्त आहे. देशविरोधी मानसिकता रोखणे आवश्यक आहे. कट रचणाऱयांचे सामर्थ्य वाढल्यास भविष्यात दुसरा मार्ग बंद केला जाईल. कुठल्यातरी वस्तीला रोखले जाईल. दिल्लीतील ही अराजकता रोखण्याचे काम केवळ येथील नागरिक करू शकतात. भाजपला दिलेले प्रत्येक मत हे काम करू शकते, असे मोदी म्हणाले.
बाटला हाउस, तुकडे-तुकडे गँग
यापूर्वी दिल्लीत दहशतवादी हल्ले आणि बॉम्बस्फोटांमुळे लोक मारले जायचे. सुरक्षा दल आणि जनतेच्या सतर्कतेमुळे हे हल्ले आता थांबले आहेत. पण याच हल्ल्यांच्या गुन्हेगारांना दिल्ली पोलिसांनी बाटला हाउसमध्ये कंठस्नान घातले असता त्याला बनावट चकमक ठरविले गेले. हेच नेते आता भारताचे तुकडे-तुकडे करण्याची इच्छा बाळगणाऱयांना वाचवत आहेत. मतपेढी, तुष्टीकरणाचे राजकारण यासाठी कारणीभूत असल्याचा आरोप पंतप्रधानांनी केला आहे.
भाजपकडूनच विकास शक्य
11 फेब्रुवारीनंतर दिल्लीत भाजपचे सरकार स्थापन होऊन विकासाला वेग मिळणार असल्याचा दावा मोदींनी केला आहे. दिल्लीत पंतप्रधान आवास योजना, आयुष्मान भारत लागू करण्यात न आल्याने गरिबांना सुविधांपासून वंचित रहावे लागले आहे. गरिबांना घर मिळावे, मोफत उपचार मिळावेत, अशी केजरीवाल सरकारची इच्छा नसल्याचे मोदी म्हणाले.
जुन्या समस्या हद्दपार
दशकांपेक्षा जुनी आव्हाने आणि समस्या निकाली लावण्याचे काम हाती घेतले आहे. कलम 370 पासून देशाला 70 वर्षांनी मुक्ती मिळाली आहे. राम जन्मभूमी प्रकरणी 70 वर्षांनी निर्णय लागला. कर्तारपूर कॉरिडॉर 70 वर्षांनी निर्माण झाला. बांगलादेश सोबतचा सीमा वाद 70 वर्षांनी निकालात निघाला. पाक, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातून आलेल्या शरणार्थींना 70 वर्षांनी नागरिकत्व मिळाले. राष्ट्रीय युद्धस्मारक 60 वर्षांनी उभे राहिले. शत्रू मालमत्तेचा कायदा 50 वर्षांनी निर्माण करण्यात आल्याचे म्हणत मोदींनी काँग्रेसवर निष्क्रीयतेचा आरोप केला आहे.
देश सर्वोच्चस्थानी
भाजपकरता देश सर्वोच्चस्थानी आहे. देशासाठी घेण्यात आलेले संकल्प पूर्ण करण्यासाठी आम्ही दिवसरात्र झटत आहोत. देशासमोरील जुन्या समस्या दूर केल्या जात आहेत. दिल्लीतील अवैध वसाहतींचा प्रश्न निकालात काढत 40 लाखांहून अधिक लोकांची सर्वात मोठी चिंता भाजप सरकारने दूर केली आहे. दिल्लीवासीयांना दिलेले आश्वासन भाजपने पूर्ण केले आहे. अनेकांनी अडथळे आणल्याने थेट संसदेत कायदा निर्माण करून दिल्लीला हा अधिकार दिल्याचे मोदी यांनी म्हटले आहे.









