नागरिकांतून समाधान व्यक्त : जनतेने मानले अधिकाऱयांचे आभार
प्रतिनिधी / बेळगाव
शास्त्री नगरमधील गणेश मंदिराच्या शेजारी असलेल्या नाल्यामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये जलपर्णी मोठय़ा प्रमाणात वाढली होती. त्यामुळे पाण्याचा निचरा होत नव्हता. या दूषित पाण्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली होती. डासांचा प्रादुर्भावही वाढला होता. त्यामुळे शास्त्राrनगर, हुलबत्ते कॉलनी परिसरातील नागरिकांना आरोग्याच्या समस्या भेडसावत होत्या. तातडीने या नाल्याची दुरुस्ती करावी अशी मागणी मनपाकडे करण्यात आली होती. त्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱयांनी या नाल्याची सफाई केली आहे. त्याबद्दल महापालिकेचे आभार व्यक्त करण्यात आले.
या नाल्याची अवस्था पाहून गणेश मंदिर मंडळाचे कार्यकर्ते श्रीकांत देसाई, अरुण कामुले, प्रकाश नेतलकर, उदय अणवेकर, राहुल पाटील यांनी आरोग्य विभागाचे डॉ. संजीव डुमगोळ यांच्याशी संपर्क साधला. आदिल खान, महांतेश नरसण्णावर यांच्याशीही संपर्क साधण्यात आला. त्यानंतर या सर्व अधिकाऱयांनी या नाल्याची पाहणी केली.
त्यानंतर अधिकाऱयांनी आरोग्य निरीक्षक शिवानंद भोसले, कंत्राटदार सचिन देमट्टी तसेच इतरांना या नाल्याची सफाई करण्याची सूचना केली. त्यांनी या नाल्याची साफसफाई केली. महापालिकेने या राबविलेल्या स्वच्छता मोहिमेबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
सदाशिवनगर येथील नाल्याचा विकास कधी?

सदाशिवनगर शेवटचा क्रॉस पारसी स्मशानभूमीमागे परिसरात सांडपाणी सोडण्यात आले आहे. नाल्याचे बांधकाम न केल्यामुळे हे पाणी साचून परिसरात रोगराई पसरत आहे. एकीकडे शहर स्मार्ट होत असताना दुसरीकडे पायाभूत सुविधांसाठी रहिवाशांना मनपाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. वारंवार तक्रारी करूनही दुर्लक्ष करण्यात येत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
नेहरूनगरपासून सोडलेले सांडपाणी सदाशिवनगर शेवटचा क्रॉस येथे साचत आहे. या नाल्याचे बांधकाम करावे अशी वारंवार मागणीदेखील करण्यात आली आहे. परंतु याकडे सोईस्कररीत्या दुर्लक्ष करण्यात येत आहे. यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. दुर्गंधी व डासांच्या समस्येने रहिवासी हैराण झाले आहेत. त्यामुळे या नाल्याचे बांधकाम केव्हा सुरू होणार, असा प्रश्न रहिवासी विचारत आहेत.









