दुबई / वृत्तसंस्था
मावळते मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री व टी-20 क्रिकेटमध्ये कर्णधार या नात्याने शेवटचा सामना खेळणाऱया विराट कोहली यांच्या पर्वाची आज (सोमवार दि. 8) नामिबियाविरुद्ध औपचारिक लढतीच्या माध्यमातून सांगता होईल, त्यावेळी कारकिर्दीचा विजयी समारोप करण्याचा या द्वयीचा प्रयत्न असेल. न्यूझीलंडने अफगाणला पराभूत केल्यानंतर भारताचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्याने भारत-नामिबिया ही सुपर-12 फेरीतील शेवटची लढत निव्वळ औपचारिक असेल, हे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. आजची लढत सायंकाळी 7.30 वाजता खेळवली जाणार आहे.
रविवारी सायंकाळी 6.30 च्या दरम्यान न्यूझीलंडने अफगाणविरुद्ध विजयी धाव घेतली आणि भारतीय चाहत्यांची घोर निराशा होणे त्यानंतर साहजिक होते. बीसीसीआयच्या ऑफिशियल मीडिया व्हॉट्सअप ग्रूपवर देखील ऐच्छिक सराव सत्र रद्द करण्यात आल्याचा संदेश झळकला, त्यावेळी भारतीय पथकातील वातावरण कसे आहे, याचाच जणू दाखला मिळाला. भारताने बाद फेरीपूर्वीच स्पर्धेतून बाहेर फेकले जाण्याची ही 2012 नंतरची पहिलीच वेळ आहे.
भारतीय खेळाडू रविवारी अफगाण-न्यूझीलंड लढतीवर लक्ष ठेवून होते. मात्र, सामन्याच्या मध्यापर्यंत निकाल जवळपास स्पष्ट झाला आणि खेळाडूंना मंगळवारी आपापल्या शहराकडे रवाना होण्याचा जणू मार्गच मोकळा झाला.
नामिबियाविरुद्ध भारतीय संघ मोठा विजय मिळवण्यात यशस्वी होईलही. पण, या विजयाने काहीही साध्य होणार नाही, हे स्पष्ट आहे. राहुल चहर, इशान किशन यांना खेळवले जाणार का, इतकेच औत्सुक्य असेल. भारतीय संघाने विश्वचषकात असे औपचारिक सामने अगदी क्वचित खेळले आहेत. यापूर्वी, 1992 विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटचा औपचारिक साखळी सामना खेळण्यापूर्वी भारतीय संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर फेकला गेला होता.
भारताला या स्पर्धेत दोनवेळा महत्त्वाच्या लढतीत नाणेफेक गमवावी लागली आणि याचा संघाला मोठा फटका बसला. भरीत भर म्हणून फलंदाजी व गोलंदाजीतही खेळाडूंनी सपशेल निराशा केली.
आयसीसी इव्हेंटमध्ये किमान उपांत्य फेरीत न पोहोचण्याची भारतासाठी 2013 चॅम्पियन्स चषकानंतर ही पहिलीच वेळ ठरली. 2013 मध्ये भारतीय संघ चॅम्पियन्स चषक विजेता ठरला. पुढे, 2014 मध्ये टी-20 विश्वचषकात उपविजेता ठरला तर 2015 वनडे विश्वचषकात संघ उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला. 2016 टी-20 विश्वचषकातही संघाला शेवटच्या 4 पर्यंतच पोहोचता आले. 2017 चॅम्पियन्स चषक फायनलमध्ये भारताला पाकिस्तानने नमवले. 2019 मध्ये भारताचे आव्हान उपांत्य फेरीत तर 2 वर्षे चाललेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये संपुष्टात आले. पुढील टी-20 विश्वचषक अवघ्या 11 महिन्यांच्या अंतराने होत असून त्या पार्श्वभूमीवर संघाला नव्याने तयारी सुरु करावी लागणे स्वाभाविक आहे.
प्रतिस्पर्धी संघ
भारत ः विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, सुर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पंडय़ा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, जसप्रित बुमराह, मोहम्मद शमी, राहुल चहर, वरुण चक्रवर्ती, शार्दुल ठाकुर.
नामिबिया ः गेरहार्ड इरासमुस (कर्णधार), स्टीफन बर्ड, बिर्केन्स्टॉक, प्रीझ, फ्रिलिंक, झेन ग्रीन, निकोल इटॉन, बर्नार्ड स्कॉल्त्झ, बेन शिकिंगो, जेजे स्मिट, रुबेन, मायकल व्हान लिन्गेन, डेव्हिड विएझे, क्रेग विल्यम्स, पिक्की या फ्रान्स.
सामन्याची वेळ ः सायं. 7.30 वा.









