बेळगाव / प्रतिनिधी
शहरातील अनेक ठिकाणी गटारी, नाले यामध्ये झाडे-झुडपे वाढल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. तसेच सांडपाणी एकाच जागी थांबून राहत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे रहिवाशांना डेंग्यू, मलेरिया यासारखे आजार होत आहेत. ही बाब लक्षात घेऊन शास्त्रीनगर व न्यू गुड्सशेड रोड येथील राहुल पाटील यांनी ही बाब महापालिकेच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर महापालिकेच्यावतीने नाल्याच्या साफसफाईला प्रारंभ करण्यात आला आहे.
दरवषी नाल्यांची साफसफाई पावसाळय़ापूर्वी करण्यास दिरंगाई करण्यात येते. मात्र परिसरात असलेल्या समस्यांचा विचार करून महापालिकेने हे पाऊल ताबडतोब उचलले आहे. त्यामुळे न्यू गुड्सशेड रोड व शास्त्रीनगर येथील रहिवाशांतून समाधान व्यक्त होत आहे. महानगरपालिकेचे पर्यावरण अभियंते आदिल खान यांच्या नेतृत्वाखाली तसेच आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार हे काम चालू आहे. तसेच येथील नाल्याची संरक्षक भिंत तुटल्यामुळे पावसाळय़ात सर्व पाणी नागरिकांच्या घरात शिरते. त्यामुळे ही परिस्थिती येणाऱया काळात उद्भवू नये यासाठी नाल्याची संरक्षक भिंत लवकरात लवकर बांधावी, अशी मागणी देखील करण्यात आली आहे.









