प्रतिनिधी / कोल्हापूर
सर्व बाजूंनी अद्ययावत बनवण्यात येत असलेल्या शास्त्रीनगर क्रिकेट मैदानाची उर्वरीत कामांना गती मिळवून देण्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी दिला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी सागरमाळ स्पोर्टस् असोसिएशनच्या पदाधिकाऱयांना दिली. मंत्री पाटील यांनी शास्त्रीनगर मैदानाची शनिवारी पाहणी केली. यावेळी मैदानात आजवर केलेल्या कामांसह उर्वरीत कामांची माहिती जाणून घेतली. असोसिएशनचे अध्यक्ष काकासाहेब पाटील यांनी उर्वरीत कामांची माहिती सांगितली.
जिल्हा नियोजन समितीकडून मिळालेले 3 कोटी व महापालिकेने दिलेल्या 80 लाख रुपयांच्या निधीतून मैदानात अद्ययावत लॉन, विद्युत व्यवस्था केली आहे. सध्या न्युझीलंडच्या धर्तीवर मैदानाभोवतीने बैठक व्यवस्था केली जात आहे. या सर्व कामांसाठी महापालिका शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी मोलाचे योगदान दिले आहे. आता मैदानात ड्रेसिंग रुम, समालोचक बॉक्स व खेळाडूंसाठी लंच हॉल बांधण्यासाठी 8 कोटीच्या निधीची गरज आहे. हा निधी लवकरात लवकर मिळाल्यास कामांना गती येईल, शिवाय मैदान सामन्यांसाठी खुले ही करता येईल.
यावर मंत्री पाटील म्हणाले, कसबा बावडा आणि शास्त्रीनगर या दोन्ही मैदानासाठी निधी दिली जाईलच. शिवाय या दोन्ही मैदानांचा उद्घाटन समारंभ प्रसिद्ध खेळाडूच्या उपस्थित केला जाईल. तसेच कबड्डी, बास्केटबॉल, टेबल टेनिस, मल्लखांब, बॅडमिंटन यासारख्या खेळांकरिता 10 कोटी रुपये खर्च शहरात इनडोअर स्टेडियम उभारण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. शिवाजी स्टेडियम येथील रिकाम्या जागेतही इनडोअर स्टेडियम उभारले जाईल, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले.
यावेळी कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष बाळ पाटणकर विद्यमान अध्यक्ष चेतन चौगुले, उपाध्यक्ष रमेश हजारे, सचिव केदार गयावळ, अभिजीत भोसले, जनार्दन यादव, नंदू बामणे, संजय पठारे, माजी उपमहापौर संजय मोहिते, हरिदास सोनवणे, माजी नगरसेवक संभाजी जाधव, सुरेश ढोणुक्षे, किरण खतकर, सर्जेराव साळोखे व विनायक सूर्यवंशी उपस्थित होते