कुपवाड / प्रतिनिधी
कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी ब्रेक द चेन या धोरणानुसार औद्योगिक क्षेत्रावर राज्य शासनाने घालून दिलेल्या नियमानुसारच जिल्ह्यातील उद्योग सुरु राहतील. याची उद्योजकांनी दक्षता घ्यावी. नियमांचे उल्लंघन झाल्यास त्यांच्यावर कड़क कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी उद्योजकांच्या बैठकीत दिला आहे.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीच्या अनुषंगाने शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांची जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक नितीन कोळेकर यांच्यासोबत बैठक झाली. यावेळी कृष्णाव्हॅली चेंबरचे अध्यक्ष शिवाजी पाटील, बामनोली इंडस्ट्रियलचे अध्यक्ष अनंत चिमड, सदाशिव मलगान, मिरज एमआयडीसीचे अध्यक्ष संजय अराणके, माधव कुलकर्णी यांसह जिल्ह्यातील विविध औद्योगिक संघटनाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी शासनाने दिलेल्या आदेशानुसार अत्यावश्यक उत्पादन घेणारे उद्योग, एक्स्पोर्ट उद्योग, पॅकिंग उद्योग, सलग प्रक्रियामधील उद्योग व त्यांना कच्या मालाचा पुरवठा करणारे उद्योग सुरू राहतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे यापूर्वी ज्या उद्योगांनी अत्यावश्यक व सलग प्रक्रिया उद्योगांची औद्योगिक महामंडळ अथवा जिल्हा उद्योग केंद्राकडून घेतलेली परवानगी ग्राह्य धरण्यात येईल. तसेच जे उद्योग वरीलप्रमाणे कोणत्याही वर्गवारीमध्ये बसत नाहीत, त्यांना उद्योग सुरु करता येणार नाही. परंतु, ज्यांच्या कारखान्यात कामगारांसाठी रहाण्याची व्यवस्था आहे, असे उद्योग सुरू रहातील, असे सूचित करणेत आले आहे. यापुढील काळात कारखानदारांकडून कोरोनासंबंधी शासनाच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन होते का नाही? याविषयी लक्ष ठेवयासाठी जिल्ह्यातील सर्व औद्योगिक क्षेत्रात पाहणी करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र व औद्योगिक महामंडळ यांच्यामार्फ़त तपासणी पथके तयार केली आहेत. या पथकाकडून उद्योगांना भेटी देण्यात येणार आहेत. उद्योजकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
Previous Articleकृषी व्यवस्थेच्या विकासाचे प्रारुप
Next Article कोरोना रूग्णांसह नातेवाईक यंत्रणेसमोर हतबल!








