प्रतिनिधी/ सातारा
सुमारे दिडवर्षापूर्वी झालेल्या सातारा नगरपरिषदेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या भागातील विविध कामांसाठी सातारा नगरपरिषदेने सुमारे 51 कोटी रुपयांचा विस्तृत विकास आराखडा तयार केला होता. त्यास नगरपरिषदेच्या जनरल कौन्सिलची मंजूरी घेवून, सदरचा विकास आराखडय़ानुसार विशेष निधी मिळण्याबाबत नगरविकास विभागाकडे प्रस्तावित करण्यात आले होते. याकामी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची आम्ही समक्ष भेट घेवून याचा सतत पाठपुरावा केला. हद्दीवाढीतील भागातील नागरिकांना दर्जेदार सुविधा मिळाल्या पाहीजेच ही आमची समाजकेंद्रीत धारणा आहे. आमच्या या प्रयत्नांना यश आले असून, शासनाकडून 48 कोटींच्या प्रस्तावास मंजूरी मिळालेली आहे. या निधी पैकी पहिला हप्ता लवकरच नगरपरिषदेला प्राप्त होईल, अशी माहीती सातारा विकास आघाडीचे अध्यक्ष खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.
दरम्यान गत महिन्यात 58 कोटी रुपयांच्या प्रशासकीय इमारतीस मंजूरी मिळून, पैकी 10 कोटीचा पहिला हप्ता प्राप्त झाला आणि आज 48 कोटींच्या हद्दवाढ भागातील कामांना मंजूरी प्राप्त झाली आहे. चैत्र शुध्द पाडव्याच्या नववर्षाच्या निमित्ताने खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी समतोल आणि ठोस विकासाकरीता सातारकर नागरिकांना डबल धमाका-विशेष भेट दिली आहे अशी प्रतिक्रीया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
याविषयी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांनी नमुद केले आहे की, शाहुपूरी, शाहूनगर, विलासपूर, खेड, येथील भाग नगरपरिषदेच्या हद्दीत समाविष्ट झाला. बहुप्रतिक्षित हद्दवाढ झाल्याने आमच्यावरीत जबाबदारी देखिल वाढली होती. प्रत्येक कुटुंबाला मुलभूत सुविधा मिळाल्याच पाहीजेत किंबहुना सार्वजनिक सोयीसुविधांच्या माध्यमातून त्यांचे राहणीमान अधिक सुखद झाले पाहीजे. प्रत्येक कुटुंब आमच्या परिवारातीलच आहे. त्यामुळे आवश्यक असलेल्या कामांचा खाली नमुद केलेप्रमाणे आराखडा तयार केला.
हद्दवाढ भागातील 3.75 मिटर रुंदीचे 6 कोटी 56 लाख, 5.50 मिटर रुंदीचे रस्ते रुपये 7 कोटी 45 लाख, 7.50 मिटर रुंदीचे 2 कोटी 94 लाख रुपयांचे रस्ते, हद्दवाढ 3.75 मिटर रुंदीचे रुपये 4 कोटी 73 लाखांचे नवीन रस्ते, 5.50 मिटर रुंदीचे 3 कोटी 33 लाखांचे नवीन रस्ते, 7.50 मिटर रुंदीचे नवीन रस्त्यांसाठी रुपये 88 लाख रुपये, 400 बाय 600 मापाचे आरसीसी गटर्स रुपये 6 कोटी 70 लाख, 600 बाय 750 मापाचे आरसीसी गटर्स करणेकामी रुपये 3 कोटी 47 लाख, विविध ठिकाणी स्ट्रीट लाईटस उभारणेकामी रुपये 3 कोटी 48 लाख, मोकळयाजागांचा विकास आणि वृक्षारोपण करणेकामी रुपये 4 कोटी 63 लाख, आणि सुमारे 4 कोटी 33 लाखांचे अस्तित्वातील रस्त्यांचे रुंदीकरण आणि मजबुतीकरण करणेची विविध कामे प्रस्तावित करण्यात आलेली होती.
राज्यशासनाकडून याकामी 48 कोटीच्या प्रस्तावास मंजूरी मिळाली आहे. लवकरच यापैकी पहिल्या हप्त्याचा निधी नगरपरिषदेस प्राप्त होणार आहे. हद्वाढ भागाचा समतोल विकास साधताना, बचतगटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण, रोजगार निमिर्ती, बाग-बगिचे आणि उद्याने विकसित करणे,दर्जेदार रस्ते-गटर्स, पाईपड्रेन, स्ट्रीट लाईटस् इ.कामांबरोबरच शाश्वत विकासाची कामे मार्गी लावण्यात येतील. मंजूर हद्वाढ विकास प्रकल्पानुसार प्रशासकीय कार्यवाही करुन, लवकरच कामांना सुरुवात करण्यात येणार आहे असेही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नमुद केले आहे.








