प्रतिनिधी / सातारा :
शासकीय धान्य पुरवठा करणाऱ्या वाहनास जीपीआरएस बसवण्याचा आदेश असून सुद्धा धान्य पुरवठा वाहतूक ठेकेदारास मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा व संबंधित ठेकेदाराला दंड करून त्यांच्या मालमत्तेची व संपत्तीची चौकशी करा, अशी मागणी रिपाइंच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करणारे निवेदन प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.यावेळी जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ, युवक जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ धोत्रे, तालुका कार्याध्यक्ष किरण ओव्हाळ, अनिल उमापे, राजू ओव्हाळ आदी उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे, की जिल्हा पुरवठा शाखेच्या माध्यमातून शासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे प्रत्येक वाहनाला जीपीआरएस सुविधा बसवणे गरजेचे आहे. अशा प्रकारचे आदेश असताना सुद्धा पुरवठा करणाऱ्या वाहतूक कंत्राटदार घाडगे यांनी कुठल्याही पद्धतीने अन्नधान्य पुरवठा करणाऱ्या वाहनांना जीपीआरएस बसवला नाही. त्यांना सहकार्य करणाऱ्या प्रत्येक तालुक्याच्या पुरवठा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. तसेच संबंधित ठेकेदारास दंड करून त्याच्या मालमत्तेची चौकशी करण्यात यावी. कोरोनाच्या काळामध्ये ऑक्सिजनच्या गाड्यांना सुद्धा जीपीआरएस बसविण्यात आले आहेत, तरी पुरवठा ठेंकेदारांकडून शासकीय धान्य वाटप करताना भ्रष्टाचार होऊ नये व अन्नधान्य पुरवठा वाहणे कुठ पोचलेत हे पाहणे गरजेचे आहे. तसेच शासकीय माल जिथे भरलेला आहे. जिथे पोहचवायचा आहे, तिथे पोहचतोय का याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.









