नागरिकांना रांगेत थांबावे लागत असल्याने गैरसोय
प्रतिनिधी /बेळगाव
शेतकऱयांसह सर्वसामान्य जनतेला शासकीय कागदपत्रे वेळेत उपलब्ध व्हावीत, यासाठी शासनाने नेम्मदी केंदे सुरू केली आहेत. मात्र बरीच नेम्मदी केंदे काही ना काही कारणास्तव बंद आहेत. त्यामुळे जुन्या तहसीलदार कार्यालयातील नेम्मदी केंद्रावर ताण वाढत आहे. परिणामी नागरिकांना शासकीय कागदपत्रे मिळविण्यासाठी तासन् तास रांगेत थांबावे लागत आहे.
केंद्र सरकारकडून विविध योजना व सुविधा पुरविल्या जातात. या शासकीय योजनांचा आणि सुविधांचा लाभ घेण्यासाठी सातबारा उतारा आवश्यक असतो. तसेच पीक कर्ज, कृषी अनुदाने, अवजारे, बी-बियाणे, खते, खरेदी-विक्री यासह इतर कामांसाठी सातबारा अनिवार्य आहे. मात्र तो वेळेत मिळत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. मागील दोन वर्षात अतिवृष्टीमुळे शेतकऱयांना मोठा फटका बसला. नुकसान भरपाई मिळविण्यासाठी सातबारा आवश्यक आहे. मात्र तो मिळविण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
शासकीय कागदपत्रे लवकर उपलब्ध व्हावीत, याकरिता सांबरा, काकती, उचगाव, एपीएमसी मार्केट आदी ठिकाणी जनस्नेही केंदे सुरू करण्यात आली आहेत. मात्र ही केंदे वारंवार बंद असतात. त्यामुळे नागरिकांना शहराकडे धाव घ्यावी लागते. जुन्या तहसीलदार कार्यालयात असलेल्या नेम्मदी केंदात दररोजच उताऱयासाठी गर्दी होते. त्यातच काहीवेळा सर्व्हर डाऊन व इतर तांत्रिक अडचणी निर्माण होतात. त्यामुळे नागरिकांना काहीवेळा रिकाम्या हाताने परतावे लागते. यासाठी जुन्या तहसीलदार कार्यालयासह इतर ठिकाणी असलेली जनस्नेही केंदे सुरळीत सुरू करावीत, अशी मागणी होत आहे.
जुन्या तहसीलदार कार्यालयात सातबारा उताऱयाबरोबर जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, वारसा, अधिवास प्रमाणपत्र आदी कागदपत्रांची पूर्तता केली जाते. त्यामुळे कार्यालयाच्या परिसरात नागरिकांची वर्दळ वाढत आहे.









