नाहक त्रास देत असलेल्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी : अन्यथा टप्प्याटप्प्याने कामबंद आंदोलनाचा खानापुरातील कर्मचाऱयांचा इशारा
प्रतिनिधी /खानापूर
येथील शासकीय इस्पितळातील डॉक्टर्स व कर्मचारीवर्गाने तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढून आपल्याला नाहक त्रास देत असलेल्यांचा बंदोबस्त करावा, या मागणीचे निवेदन तहसीलदार प्रवीण जैन व पोलीस उपनिरीक्षक संगमेश जालीहाळ यांना दिले.
तालुका आरोग्य अधिकारी संजय नांदे व डॉ. नारायण वड्डीन यांच्या नेतृत्वाखाली शासकीय इस्पितळातील डॉक्टर व कर्मचारीवर्गाने सोमवारी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. याप्रसंगी तालुका विकास आघाडीचे अध्यक्ष भरमाणी पाटील व सहकारी, तसेच ग्रामपंचायत सदस्य युनियनचा बंदोबस्त करावा, अशी मागणीही करण्यात आली.
अधिकाऱयांकडून तक्रारींचा पाढा
गेल्या 21 मार्चपासून तालुका विकास आघाडीचे भरमाणी पाटील व त्यांचे सहकारी रोज इस्पितळात येऊन आम्हाला काम करण्यास देत नाहीत. अतिशय वाईट प्रकारचे आरोप करतात. इस्पितळातील प्रत्येक विभागात जाऊन पाहणी करतात. येथील कर्मचारीवर्गाला व परिचारिकांना मोठमोठय़ाने अर्वाच्च भाषेत आरडाओरड करून अपमानास्पद वक्तव्य करून कामात व्यत्यय आणत आहेत. डॉक्टरांकडे पैशाची मागणी करत आहेत. सर्व डॉक्टर व कर्मचारीवर्गाला धमकावण्यामुळे कर्मचारीवर्ग भयभीत झाला आहे. भरमाणी पाटील यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून आम्हास संरक्षण द्यावे, अशी मागणी संजय नांदे यांनी यावेळी केली. तसे लेखी निवेदनही तहसीलदार व पोलीस निरीक्षक संगमेश जालीहाळ यांना देण्यात आले. यावेळी तहसीलदार प्रवीण जैन यांनी पोलीस उपनिरीक्षकांना योग्य क्रम घेण्याच्या सूचना केल्या. तालुका आरोग्य अधिकारी म्हणाले, गेल्या 21 मार्चपासून भरमाणी पाटील हे रोज आपल्या सहकाऱयांना घेऊन इस्पितळात येऊन कामात व्यत्यय आणून धमकावत आहेत. त्यामुळे डॉक्टर व कर्मचारीवर्ग भयभीत झाला आहे. यामुळे इस्पितळात वैद्यकीय सेवा देणे मुश्कील झाले आहे. पाच दिवसात भरमाणी पाटील व सहकाऱयांवर कारवाई झाली नाही तर टप्प्याटप्प्याने सर्व कर्मचारी कामबंद आंदोलन करतील, असा इशाराही डॉ. नांदे यांनी दिला. यावेळी डॉ. सुरेश राव, डॉ. तस्लीम बानु, डॉ. वरदराज नायक, डॉ. प्रभूराज तोडकर, डॉ. पूजा एम. बी. यासह डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते.
…तर जनतेसाठी त्यागास तयार
याबाबत तालुका विकास आघाडीचे भरमाणी पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, सर्वसामान्यांच्या आरोग्य समस्येबाबत डॉक्टरांना विचारणा केली असता माझ्यावर नाहक आरोप करत आहेत. मी लोकशाहीने दिलेल्या अधिकाराचा वापर करून न्याय मागितला आहे. फौजदारी कारवाई केल्यास मी समर्थपणे सामोरे जावून जनतेच्या हक्कासाठी कोणताही त्याग करायला तयार आहे.
फौजदारी गुन्हा दाखल
येथील शासकीय इस्पितळाचे डॉ. नारायण वड्डीन यांच्या फिर्यादीवरून भरमाणी पाटील यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय कामात अडथळा आणणे, धमकावणे या स्वरुपाचे गुन्हे दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. 353 व 506 सह इतर कलमांखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे. खानापूर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, भरमाणी पाटील हे ‘नॉट रिचेबल’ झाले आहेत.