संरक्षण खात्याकडे तक्रार करणार असल्याची माहिती उपलब्ध
प्रतिनिधी /बेळगाव
कॅन्टोन्मेंट बोर्डने विविध ठिकाणी असलेले व्यापारी गाळे व मार्केट भाडेतत्त्वावर दिली आहेत. महसूल जमा करण्यासाठी पार्किंगकरिताही भू-भाडे आकारले जाते. मात्र मोक्मयाच्या ठिकाणी व कॅन्टोन्मेंट कार्यालयाशेजारील शाळेचे मैदान विनामोबदला भाडेतत्त्वावर देण्यामागचे गौडबंगाल काय? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्डकडे निधी नसल्याने विकासकामे करण्यास टाळाटाळ केली जात आहे. मात्र शाळेचे मैदान विनामोबदला भाडेतत्त्वावर दिल्याने खळबळ उडाली आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डने हा निर्णय कोणत्या निकषांवर घेतला? अशी विचारणा नागरिक करीत आहेत. महसूल जमा करण्यासाठी प्रत्येक गाळेधारकांकडून भाडे आकारले जाते. भाडे न दिल्यास कायदेशीर कारवाई करून गाळे रिकामी केले जातात. कॅन्टोन्मेंट बोर्डने ठिकठिकाणी व्यापारी संकुले उभारली आहेत. या संकुलांतील गाळे भाडेतत्त्वावर देण्यात आले आहेत. व्हेजिटेबल, प्रुटमार्केट, फोर्कमार्केट, फिश मार्केट अशा विविध ठिकाणी असलेले गाळे भाडेतत्त्वावर देऊन महसूल वाढीचा प्रयत्न कॅन्टोन्मेंटने केला आहे. तसेच होर्डिंग्ज, भू-भाडे, पार्किंग शुल्क आकारणी, पाणीपट्टी वाढ करून महसूल वाढीचा प्रयत्न केला आहे. मात्र शाळेचे मैदान विनामोबदला देण्याचा निर्णय कॅन्टोन्मेंट बोर्डने कसा घेतला? असा मुद्दा उपस्थित झाला आहे.
अधिकाऱयांनी स्वतःचे खिसे भरण्याचा प्रकार केल्याची चर्चा
कॅन्टोन्मेंट बोर्डला केंद्र आणि राज्य शासनाकडून अनुदान देण्यात येत होते. मात्र हे अनुदान काही वर्षांपासून बंद झाले आहे. त्यामुळे विकासकामे रखडली आहेत. कॅन्टोन्मेंटवासियांना नागरी सुविधा देण्यास कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडे निधी उपलब्ध नाही. तसेच पाणीपट्टी भरण्यासाठी निधी नाही. पथदिपांच्या विद्युतबिलाची रक्कम भरण्यासाठी निधी नसल्याने हेस्कॉमने विद्युतपुरवठा तोडला आहे. अशी स्थिती असताना कॅन्टोन्मेंट बोर्डने शाळेचे मैदान विनामोबदला दिले आहे. यासाठी आर्थिक व्यवहार करून स्वतःचे खिसे भरण्याचा प्रकार अधिकाऱयांनी केल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे संरक्षण खात्याकडेच तक्रार करण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.









