तार्ताहर / उचगाव
बेळगाव तालुक्मयामध्ये पंधरा वर्षाच्या आतील मुलांमध्ये सर्दी, ताप, खोकला, डोकेदुखी अशा प्रकारच्या व्हायरल इन्फेक्शनमुळे विद्यार्थीवर्ग त्रस्त असल्याचे चित्र अनेक शाळांमधून दिसून येत आहे. त्यामुळे पालकवर्गातून पुन्हा एकदा चिंता व्यक्त करण्यात येत आहे. शाळेत येण्याची मनापासून इच्छा असूनही आजारामुळे शाळेत पोचणे मुश्कील झाल्याने विद्यार्थीवर्गातून नाराजी व्यक्त होत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण खात्याने 23 ऑगस्टपासून नववी आणि दहावीचे तर सहा सप्टेंबरपासून आठवीचे वर्ग नियमित सुरू केले. विद्यार्थी, पालक, शिक्षक या सर्वांना शाळा चालू राहणे गरजेचे होते. कोरोना संकटामुळे शिक्षण खात्याने उशिरा का होईना, पण निर्णय घेऊन शाळांना प्रारंभ केला. मात्र, सध्या संपूर्ण बेळगाव तालुक्मयातील प्राथमिक, माध्यमिक शाळांमधून विद्यार्थी वर्गामध्ये सर्दी, ताप, खोकला, डोकेदुखी अशा आजारांनी घेरले असल्याने पुन्हा एकदा पालक, शिक्षकवर्गाची चिंता वाढली आहे. शिक्षण खात्याने सर्व शाळांना नियमावली जारी करून सर्व ती खबरदारी घेऊन शाळा सुरू करण्यास प्रारंभ केला.
पाल्यांची शैक्षणिक प्रगती खुंटण्याची पालकांना चिंता
विद्यार्थ्यांना दररोज मास्कची सक्ती करून वर्गामध्ये अथवा घरी जाताना सामाजिक अंतर राखण्याच्या सूचना केल्या. आठवडय़ातील पाच दिवस शाळा चालू ठेवून दर शनिवारी संपूर्ण शाळेचे निर्जंतुकीकरण सक्तीचे केले. मात्र, याची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. ग्रा.पं.ना निर्जंतुकीकरणाची जबाबदारी सोपविण्यात आली. विद्यार्थ्यांनी घरातून गरम पाणी, जेवणाचा डबा आणण्याच्या सूचना केल्या. विद्यार्थी आजारी असेल तर शाळेत न येण्याची सूचनाही केली. अशा सर्व खबरदाऱया शिक्षण खात्याने, शाळेने घेतल्या. मात्र सध्या व्हायरल इन्फेक्शनमुळे शिक्षक-पालकांमध्ये चिंता वाढली आहे. कोरोनाचे संकट अजून गेलेले नाही. तिसरी लाट येणार अशी भीती निर्माण झालेली असतानाच आजाराने त्रस्त झालेल्या विद्यार्थी, पालकांसमोर संकट उभे ठाकले आहे. यापूर्वी शाळा बंद असल्याने ऑनलाईनद्वारे शिक्षण सुरू होते. आता नियमितपणे शाळा सुरू झाल्या, पण अशा वातावरणामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती खुंटणार की काय, अशी प्रतिक्रिया पालकवर्गातून व्यक्त होत आहे.
तालुक्मयातील अनेक शाळांमधून आरोग्य खात्याने विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्याचे जाहीर केले होते, मात्र, काही शाळा वगळता बऱयाच शाळांमधून आरोग्य तपासणी झालेली नाही. यासाठी आरोग्य खात्याने तातडीने सर्व शाळांतून विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून योग्य तो सल्ला, मार्गदर्शन, औषधोपचार करावेत, अशी मागणी पालक-शिक्षक वर्गातून करण्यात येत आहे.









