कोरोना प्रतिबंधासाठी जिल्हय़ातील सर्व शाळांना सूचना जारी
प्रतिनिधी/ रत्नागिरी
राज्यातील कोरोनाची परिस्थिती सुधारल्याने राज्य शासनाने शाळतील काही वर्ग सुरू करण्याची परवानगी दिली आहे. या बाबत रत्नागिरी जिल्ह्य़ातील शाळांना मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. 4 ऑक्टोबरपासून जिल्ह्य़ातील शाळांची घंटा घणघणणार आहे. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करताना विद्यार्थी, पालक व शिक्षकांची मोठी कसोटी लागणार आहे.
शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये राज्यातील ग्रामीण भागातील 5 वी ते 12 वी तर शहरी भागात 8 वी ते 12वी चे वर्ग सुरक्षितपणे सुरू करण्याबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यासाठी मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगण्यात आले आहे.
शाळा व्यवस्थापन समिती व पालक यांची सभा घेऊन शाळा सुरू करण्यासंदर्भात पूर्वकल्पना द्यावी व विद्यार्थ्यांनी कोविडसंदर्भातील घ्यावयाच्या दक्षतेबाबत पालकांना माहिती द्यावी. शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱयांचे लसीकरण करून घ्यावे. एका वर्गात एका बाकावर एक विद्यार्थी, किंवा एका वर्गात 20 ते 30 विद्यार्थी व दोन विद्यार्थ्यांत किमान 1 मीटर अंतर ठेवावे, विद्यार्थ्यांना हात धुण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देणे, शाळांमध्ये स्वच्छता, निर्जंतुकीकरण करावे. वाहनामध्ये मुलांची गर्दी होऊ नये यासाठी व्यवस्था करावी, आदी सूचनांचा यामध्ये समावेश आहे.
घरात तयार केलेले मास्क वापरणे, सुरक्षित शारीरिक अंतर ठेवणे, वारंवार हात लावले जातात अशा ठिकणी स्पर्श न करणे, स्वच्छता व त्यासंबंधी घ्यावयाची काळजी या बाबतची माहिती विद्यार्थी व पालकांना द्यावी. मुलांनी स्वतःची बॅग, पुस्तके, पाणी बॉटल, पेन, पेन्सिल इत्यादी साहित्य, स्वतःच्या जेवणाचा डबा आणावा. शाळेत शिक्षक व विद्यार्थी यांच्या व्यतिरिक्त कोणालाही प्रवेश देण्यात येऊ नये. विद्यार्थ्यांनी गृहपाठ ऑनलाईन सादर करण्याबाबत निर्देश द्यावेत, विद्यार्थ्यांमध्ये पुस्तकांची अदलाबदल होणार नाही, गृहपाठ शक्यतो वर्गांमध्येच करून घ्यावा, सद्यस्थितीत कोणत्याही प्रकारचे खेळ घेण्यात येऊ नयेत. थकलेल्या व दमलेल्या विद्यार्थ्यांकडे लक्ष असावे, असेही सांगण्यात आले आहे.
मोठय़ा पटसंख्या असलेल्या शाळांतील विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित शारीरिक अंतर राखण्यासाठी शाळा दोन सत्रांमध्ये घ्यावी, एक सत्र जास्तीत-जास्त 3 तासांचे असावे एक दिवस आड शाळेत बोलवावे, आदी मार्गदर्शन करर्यात आले आहे. विद्यार्थ्यांची पटसंख्या भौतिक साधनांची उपलब्धता, शाळा व्यवस्थापन समिती, स्थानिक प्रशासन व पालक यांच्या समन्वयाने शाळेची वेळ या बाबत निर्णय घ्यावा, असे निर्देश सर्व शाळांना देण्यात आले आहेत.
शाळांसाठी खबरदारीविषयक आणखी काही महत्वाच्या सूचनाः
@ ताप, सर्दी, जोरात श्वासोच्छवास करणारे, शरीरावर ओरखडे, डोळे लाल झालेले, ओठ फुटलेले व लाल झालेले, बोटे हात आणि सांधे सुजलेले, उलटय़ा-जुलाब व पोटदुखी असलेले विद्यार्थी यांना डॉक्टरकडे नेण्याची व्यवस्था करावी व डॉक्टरांच्या सल्ल्याने उपस्थितीबाबत निर्णय घ्यावे.
@पहिल्या 1 ते 2 आठवडय़ात थेट शिक्षणावर भर न देता विद्यार्थ्यांस शाळेची सवय होऊ द्यावी. प्रत्येक विद्यार्थ्याची पार्श्वभूमी अवगत करून त्यानुसार परस्पर संवाद साधावा.
@कोविड होऊन गेलेल्या विद्यार्थ्यांशी सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे वागावे. विद्यार्थी व पालकांशी ऑनलाईन /ऑफलाईन पध्दतीने संपर्कात राहणे. कोविड आजाराबाबत माहिती व हा आजार टाळण्याबाबत माहिती देणे.
@पालकांनी पुरेसे मास्क तयार करणे व मास्क दररोज धुणे. मुलांना मोबाईलची सवय लागू नये अशा पध्दतीने पालकांनी लक्ष ठेवण्याबाबत मार्गदर्शन करणे.
@पालकांनी वेळेत मुलांना तयार करणे. मुलांना कमीत-कमी पुस्तके, वह्या न्याव्या लागतील, अशी व्यवस्था असावी. घरात आल्यानंतर विद्यार्थ्यांनी थेट स्नान करून युनिफॉर्म बदलणे. युनिफॉर्म साबणाच्या पाण्यात बुडवून ठेवावा किंवा युनिफॉर्म ऐच्छिक करावा.
@शाळांना पॅन, सॅनिटायझर, ऑक्सीमीटर, इन्फ्रारेड थर्मामीटर, औषधे, मास्क इत्यादी सीएसआरमधून उपलब्ध करून घ्यावीत.
निर्देशांचे पालन करताना दूरच्या मुलांसमोर शाळेत येण्याचा प्रश्न
मुलांनी शाळेत पायी किंवा सायकलीने यावे किंवा पालकांनी त्यांना स्कूटर, सायकलीने शाळेस सोडावे, अशा पर्यायाचा विचार करता येऊ शकतो. मुलांना शाळेत पायी येण्यासाठी शिक्षकांनी प्रोत्साहित करावे. ज्या शाळांमध्ये स्कूलबस, खासगी वाहनाद्वारे विद्यार्थी येतात, अशा वाहनांमध्ये एका सीटवर एकच विद्यार्थी बसेल, याची दक्षता घ्यावी. विद्यार्थी बसमध्ये चढताना व उतरताना सॅनिटायझरचा वापर करण्यास प्रोत्साहित करावे, अशाही सूचना देण्यात आल्याने विद्यार्थी, पालक, शिक्षकांनाही कसरत करावी लागणार आहे.
बसमध्ये चढता-उतरताना कसरत
रत्नागिरी जिल्ह्य़ाचा विचार करता अनेक शाळा या दुर्गम भागात आहेत. त्या ठिकाणी वाहनांतून जाण्याशिवाय विद्यार्थ्यांनाही पर्याय उरत नाही. ज्या शाळांमध्ये स्कूलबस / खासगी वाहनाद्वारे विद्यार्थी येतात, अशा वाहनांमध्ये एका सीटवर एकच विद्यार्थी बसून प्रवास करेल, याची दक्षता, विशेषतः बसमध्ये चढताना व उतरताना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी वाहनचालक / वाहक यांनी विद्यार्थ्यांनी सॅनिटायझरचा वापर करावा, अशा या सूचनांचे पालन करताना विद्यार्थी, पालक, शिक्षकांसमोरही प्रश्न उभे राहणार आहेत.









