इंग्लिश मिडीअम स्कूल असोसिएशनचे अध्यक्ष गणेश नायकुडे यांची माहिती
कोल्हापूर / प्रतिनिधी
कोरोना कालावधीत दोन वर्षे शाळा बंद असलेल्या शाळा पुन्हा एकदा शाळा बंद केल्या आहेत. त्याचबरोबर शाळा सुरू ठेवल्या तर गुन्हे दाखल करणार, असा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आहे. एक प्रकारे शाहू महाराजांनी तयार केलेला शिक्षण हक्क कायदाच पायदळी तुडवला आहे. सोमवारपासून समूह अद्यापन आणि ऑनलाईन शिक्षण इंग्रजी माध्यमाच्या शाळा देतील. परंतू लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटून शाळा सुरू करण्याची विनंती करणार आहे, अशी माहिती प्रेस क्लब येथील आयोजित पत्रकार परिषदेत इंग्लिश मिडीयम स्कूल असोशिएशनचे अध्यक्ष गणेश नायकूडे यांनी दिली.
ऑनलाईन शिक्षणाच्या मर्यादा विचारात घेता इंग्लिश मिडीयम असोशियशनने सोमवारपासून शाळा सुरू ठेवणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील आणि जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी शाळा बंदचे आवाहन केले आहे. त्यामुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळाही बंद ठेवून आवाहनला प्रतिसाद देणार आहे. लॉकडाऊनमध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, शारीरिक, मानसिक व बौद्धिक नुकसान झाले आहे. डिसेंबर 2021 मध्ये शाळा सुरू झाल्यानंतर मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणने अवघड झाले होते. गेल्या दोन महिन्यात विद्यार्थ्यांची गाडी रूळावर आली होती, तेवढ्य़ात शाळा बंदचा आदेश सरकारने काढून विद्यार्थ्यांवर एक प्रकारचा अन्यायच केला आहे. 91 टक्के पालकांनी शाळा सुरू करण्याची विनंती केली आहे. परंतू सरकारच शाळा बंद ठेवून विद्यार्थ्यांना शिक्षणापासून दूर ठेवत आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या परिपत्रकानुसार इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये समूह अध्यापन, गृहभेटी व ऑनलाईन शिक्षण दिले जाईल. परंतू शाळा सुरू करण्यासाठी शैक्षणिक व्यासपीठचे एस. डी. लाड यांचाही आम्हाला पाठींबा आहे. तरी आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटून शाळा सुरू करण्याची विनंती करणार आहे. यावेळी के. डी. पाटील, एन. एन. काझी, नितीन पाटील, विल्सन वासकर, माणिक पाटील, सचिन नाईक, शहराध्यक्ष अमर सरनाईक, चंद्रकांत पाटील, किरण माळी, मोहनराव माने, पी.आय.बोटे आदी उपस्थित होते.
शाळा सुरू करा या मागणीला राज्यातील 16 हजार तर कोल्हापुरातील 410 शाळा आणि 91 टक्के पालकांचा पाठींबा आहे. त्यामुळे शाळा सुरू करा या मागणीसाठी कोल्हापुरात सुरू झालेल्या लढ्य़ात आता राज्यभरातील शाळांनी सहभाग नोंदवला आहे. बाहेर कामाला गेलेल्या पालकांकडून विद्यार्थ्यांना घरात संक्रमण होतच असते. मग सर्व अस्थापना सुरू ठेवून शाळाच का बंद ठेवायच्या असा सवाल सरकारला विचारणार आहे.