मजूर निधी घोटाळय़ाबाबत सरकार गंभीर : मुख्यमंत्री
प्रतिनिधी / पणजी
राज्यातील शाळा कधी सुरू करता येतील याबाबत शिक्षण खात्याचे संचालक चाचपणी करीत आहेत. शिक्षण संचालकांची विद्यालये, मुख्याध्यापक संघटना तसेच विविध संबंधित लोकांशी बोलणी सुरू आहे. सर्वांची मते जाणून घेतल्यानंतर राज्यातील शाळा सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
केंद्रीय गृहव्यवहार मंत्रालयाने शाळा सुरू करण्याबाबत सूचना केल्या आहेत. 15 ऑगस्टनंतर शाळा सुरू केल्या जातील. त्याला अनुसरून मुख्यमंत्र्यांना विचारले असता त्यांनी वरील उत्तर दिले. राज्यातील विद्यार्थी आणि शाळांच्या विषयावर शिक्षण खाते गंभीर असून आवश्यक ती पावले उचलली जात आहेत, असेही ते म्हणाले.
राज्याचे मुख्य सचिव, आरोग्य सचिव, पोलीस महासंचालक यांनी कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या वास्को भागाला भेट देऊन पाहणी केली आहे. या अधिकाऱयांनी मांगोरहिल वास्कोसह शिरोडा येथेही जाऊन पाहणी केली आहे, अशीही माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
मजूर निधी घोटाळय़ाबाबत गंभीर
राज्यात सध्या गाजत असलेल्या मजूर निधी घोटाळय़ाबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, मजूर खाते आवश्यक ती कारवाई करणार आहे. या घोटाळय़ाबाबत मजूरमंत्री जेनिफर मोन्सेरात यांना दोष देता येणार नाही, कारण गेली 10 वर्षे ही मजूरांची नोंदणी सुरू आहे. काही पंच सदस्य त्यात आहेत, त्यांच्याबाबत खाते तपासणी करीत आहे. एखाद्या व्यक्तीने स्वतः मजूर म्हणून नोंदणी केली असेल तर त्याला इतर कुणी काही करू शकत नाही, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.
खर्च कपातीबाबत सरकार गंभीर
कोरोनामुळे सरकारने खर्च कपातीकडे लक्ष केंद्रीत केले असून त्यासाठी आयएएस अधिकाऱयाच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन केली आहे. त्यामध्ये मायकल डिसोझा व अन्य दोन अधिकाऱयांचा समावेश आहे. राज्यपालांनीही याबाबत सरकारला पत्र पाठविले असले तरी सरकारने अगोदरच याबाबतची काळजी घेतली होती, असेही मुख्यमंत्री म्हणाले.









