बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी कोरोनाची वाढती संख्या लक्षत घेता घाईघाईने शाळा सुरू करण्याचा निर्णय योग्य नसल्याचे म्हंटले आहे. कुमारस्वामी यांनी सरकारी शाळांमध्ये प्रशासकीय मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे, लाखो विद्यार्थ्यांना मास्क वितरण करणे, नियमित कालांतराने शाळा निर्जंतुकीकरण करण्याची व्यवस्था केली आहे का, यासाठी स्वतंत्र अनुदान दिले आहे का ? बर्याच प्रश्नांवर सार्वजनिक शिक्षण विभागाची भूमिका ठाम आणि स्पष्ट नाही असेही त्यांनी म्हंटले आहे. तसेच राज्यात होणाऱ्या पोटनिवडणुकीसंदर्भातही त्यांनी वक्तव्य केलं आहे.
राज्यात दररोज कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. गुरुवारी राज्यात १० हजाराहून अधिक कोरोना रुग्णांची भर पडली आहे. रुग्ण संख्या वाढत असल्याने शाळा सुरु करून विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे शाळा सुरु करताना सरकारने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊन शाळा सुरु करण्यास घाई करू नये असे म्हंटले आहे.
दरम्यान कुमारस्वामी यांनी कोरोना साथीच्या काळात राज्यातील दोन विधानसभा मतदार संघ आणि ४ विधानपरिषदांच्या निवडणुकांवरही त्यांनी आक्षेप घेत, ही निवडणूक आणखी चार महिने पुढे ढकलली गेली असती. या साथीच्या प्रादुर्भावाच्या वेळी प्रचार करणे शक्य नाही. तसेच निवडणूक प्रचारादरम्यान सामाजिक अंतर सारख्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे शक्य होईल असे नाही.









