शिक्षण विभागाची माहिती : पाच हजार शिक्षकांची कोरोना तपासणी पूर्ण
प्रतिनिधी/ सांगली
जिह्यातील नववी, दहावी, अकरावी आणि 12 वीचे वर्ग सोमवारपासून सुरु होत आहेत. शाळा सुरू करण्याची तयारी शाळा व्यवस्थापन समितीकडून करण्यात आली आहे. तसेच शिक्षकांची कोरोना तपासणीही करण्यात आली आहे. शाळांकडून ही तयारी युद्धपातळीवर सुरु आहे. जिह्यातील दीड लाख विद्यार्थ्यांपैकी 50 हजार विद्यार्थ्यांच्या पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यास संमतीपत्र दिले असल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी सुधाकर तेलंग यांनी सांगितले.
साडेआठ हजार शिक्षकांपैकी पाच हजार शिक्षकांनी कोरोनाची तपासणी करुन घेतली आहे. कोरोनाच्या महामारीमुळे या शैक्षणिक वर्षात शाळा आणि महाविद्यालये बंद राहिली. सध्या कोरोनाची साथ कमी होत असताना नववी ते बारावीचे वर्ग सुरु करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्यानुसार जिह्यात सोमवार, 23 नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर शाळांकडून तयारी सुरु केली आहे. शाळेत विद्यार्थ्यांनी उपस्थित राहण्यापूर्वी पालकांचे संमतीपत्र आणणे बंधनकारक केले आहे. जिह्यात नववी ते बारावीचे 1 लाख 47 हजार 486 विद्यार्थी असून 50 हजार 329 विद्यार्थ्यांच्या पालकांचे ऑनलाईन संमतीपत्र शिक्षण विभागाला प्राप्त झाले आहे. संमतीपत्र असल्याशिवाय वर्गात प्रवेश दिला जाणार नाही. उर्वरित विद्यार्थी उपस्थित राहताना संमतीपत्र घेऊन येतील, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
शिक्षकांची कोरोनाची तपासणी करूनच त्यांना शाळेत प्रवेश करण्याचे आदेश दिले आहेत. जिह्यातील सुमारे साडेआठ हजार शिक्षक माध्यमिक शाळेशी निगडीत आहेत. त्या सर्वांची कोरोना तपासणी सुरु आहे. त्यातील पाच हजार शिक्षकांची तपासणी पूर्ण झाली आहे. प्राधान्याने नववी ते बारावीत शिकवणाऱया शिक्षकांची तपासणी करून घेण्याची प्रक्रिया सुरु आहे. मात्र कोरोनाची लक्षणे असलेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱयांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात येईल. याशिवाय लक्षणे नसलेल्या शिक्षकांना रॅपिड अँटिजेन तपासणी करावी लागेल. दोन्ही प्रकारच्या तपासण्या प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयात मोफत केल्या जात आहेत. प्रत्यक्ष वर्गांचा कालावधी 3 ते 4 तासांपेक्षा अधिक असू नये. जेवणाची सुट्टी नसेल. एक दिवसआड विद्यार्थ्यांना शाळेत बोलवावे. गणित, विज्ञान व इंग्रजी हे विषय शाळेत शिकवावेत. उर्वरित विषय ऑनलाईन पद्धतीने शिकविले जातील. सोय असेल तर प्रत्यक्ष वर्गात सर्व विषय शिकविण्यास हरकत नाही, अशा सूचना शिक्षणाधिकारी तेलंग यांनी संबंधित सर्व शाळांना दिल्या आहेत.








