महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे पत्राद्वारे मागणी
ऑनलाईन टीम / पुणे :
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शाळा आणि महाविद्यालयांनी शैक्षणिक वर्षातील उर्वरित फी ची इंस्टॉलमेंट (हफ्ता) संपूर्णपणे माफ करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे करण्यात आली आहे.
या आशयाच्या पत्राची प्रत उपमुख्यमंत्री अजित पवार, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना देखिल पाठविण्यात आली आहे, असे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव सनी अशोक मानकर यांनी सांगितले.
सरकारने फी रद्दबाबत निर्णय लवकरात लवकर जाहीर करावा, अशी विनंती आणि मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव सनी अशोक मानकर यांनी केली आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, संपूर्ण देशात कोरोना संसर्गामुळे अतिगंभीर परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून २३ मार्चपासून संपूर्ण लॉकडाऊन आणि संचारबंदी करण्यात आली. त्याआधी खबरदारी म्हणून १५ मार्चपासून संपूर्ण राज्यातील शाळा व महाविद्यालये बंद करण्यात आली होती आणि परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत.
अनुदानित व विनाअनुदानित इंग्रजी, मराठी शाळा व महाविद्यालयांचे शैक्षणिक वर्ष या मार्चमध्ये संपत असते. काही शाळा व महाविद्यालयांमध्ये पालकांना सोयीस्कर व्हावे म्हणून फी इन्स्टॉलमेंट सुविधा असते. ही फी २ ते ३ हफ्तामध्ये भरता येते. परंतु राज्यावर अचानक संकट आल्यामुळे संचारबंदी लागु करावी लागल्याने सर्व उद्योगधंदे, नोकरदार वर्ग यांना चांगलाच आर्थिक फटका बसला आहे. अनेक पालक हे खाजगी कंपनीत कामाला आहेत. या कंपन्या नोकरदारांना कंपन्या बंद असल्याने बंद काळातील पगार देतील की नाही यात शंका आहे.
त्यामुळे ह्या सर्व गोष्टींचा विचार करता बंद काळात घर चालवताना लागणारी कसरत पाहता शासनाला विनंती आहे की, शैक्षणिक वर्षातील शेवटीच्या फी ची राहिलेली इंस्टॉलमेंट (हफ्ता) मुदत न देता संपूर्ण माफ करावी.