प्रतिनिधी /बेळगाव
हिजाब वादाचे पडसाद उमटत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी बुधवारी विविध शाळा-महाविद्यालयांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच पोलीस कर्मचाऱयांनाही सतर्क राहण्याच्या सूचना केल्या.
हिजाब परिधान करून शाळा-महाविद्यालयात विद्यार्थिनी प्रवेश करीत असल्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत. त्याविरुद्ध पडसाद उमटण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱयांनी संवेदनशील भागातील शाळांना भेटी दिल्या. हिजाबच नाही तर इतर विद्यार्थ्यांनीदेखील गणवेश वगळता इतर कोणतेही आक्षेपार्ह कपडे परिधान करू नयेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी ठरलेला ड्रेसकोड पाळावा, यासाठी शाळा-महाविद्यालय प्रशासनाने पालक-विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे, अशी सूचना यावेळी केली. यावेळी जिल्हाधिकाऱयांनी शाळा-महाविद्यालयातील पोलीस बंदोबस्ताचीदेखील पाहणी केली. तसेच महत्त्वाच्या सूचना केल्या.
शिक्षणाधिकाऱयांकडूनही सूचना
शहरी भागात वादाचे प्रसंग उद्भवत असल्याने ग्रामीण भागात दक्षतेचे आवाहन केले जात आहे. जिल्हा शिक्षणाधिकाऱयांसह गटशिक्षणाधिकारी यांनी शिक्षकांशी गुगल मीटद्वारे संपर्क साधून सूचना केल्या. ग्रामीण भागात सर्व वर्ग शांततेत सुरू असल्याचे जिल्हा शिक्षणाधिकारी बसवराज नलतवाड यांनी सांगितले.









