1 जुलैपासून ‘अनलॉक 2.0’ शक्य : शालेय शिक्षणाबाबतच्या निर्णयाकडे सर्वांचेच लक्ष
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर सध्या ‘अनलॉक’ची प्रक्रिया सुरू आहे. 1 जूनपासून ‘अनलॉक 1.0’ ला प्रारंभ झाला असून त्याची मुदत 30 जून रोजी संपत आहे. त्यानंतर आता 1 जुलैपासून ‘अनलॉक 2.0’ सुरू होण्याची शक्यता आहे. या अनलॉकमध्ये देशातील अन्य बंद असलेल्या सेवा उघडण्याची घोषणा होऊ शकते. मात्र, कोरोनाचे रुग्ण वाढत असताना शाळा आणि महाविद्यालये सुरू करणे धोक्याचे असल्याने त्याबाबत सावधपणे निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच रेल्वे आणि हवाई प्रवासाला गती न देण्याचे संकेतही मिळत आहेत.
कोरोना संसर्गाचा सध्याचा वेग पाहता शाळा, महाविद्यालये व इतर शैक्षणिक संस्था जुलै महिन्यामध्येही उघडणे अशक्यप्राय दिसत आहे. काही अभ्यासक्रमांच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या असून शालेय शिक्षणही लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. बहुतेक राज्यांनी त्यांच्या परीक्षा आधीच रद्द केल्या आहेत. सीबीएसई, आयसीएसई बोर्डानेही परीक्षा रद्द केल्या आहेत. केवळ परीक्षार्थींना शाळेत बोलावून पेपर सोडवायला लावण्यातही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून वर्ग सुरू करणे सद्यस्थितीत अवघड दिसत आहे. त्यामुळे राज्य सरकारांकडून शाळा उघडण्याबाबतचा निर्णय लांबणीवर पडू शकतो.
लॉकडाऊननंतर मेट्रो सेवाही बंद आहे. आताही नजिकच्या काळात त्या सुरू होण्याची शक्यता कमीच दिसते. रेल्वे बोर्डाने 12 ऑगस्टपर्यंत सर्वसाधारण रेल्वे सुरू न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मोठय़ा शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाटय़ाने वाढत आहेत. मुंबई, दिल्ली, चेन्नई, बेंगळूर या महनगरांमध्येही बाधितांची संख्या वाढत असल्याने मेट्रो रेल्वे सुरू होण्याचा धोका पत्करला जाण्याची शक्यता कमी दिसते.
सध्या देशात देशांतर्गत हवाई प्रवास सुरू झाला आहे. आगामी अनलॉक 2.0 मध्ये काही विदेशी उड्डाणे सुरू होऊ शकतात. मात्र, त्यासाठीही अन्य देशांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळणे अत्यावश्यक आहे. अमेरिकेने भारताच्या वंदे-भारत अभियानावर आक्षेप घेतला होता. त्यामुळे विदेशी हवाई प्रवासही लांबणीवर पडणार आहे.
रोजगार-उद्योगधंदे सुरू करण्यावर भर
कोरोना विषाणूचा संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य नागरिकांबरोबरच उद्योगधंद्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. त्याचा तडाखा भारतीय अर्थव्यवस्थेला बसला आहे. त्यामुळे रोजगार वाढविण्यासाठी सरकार अनलॉक 2.0 मध्ये नवीन पावले उचलू शकते. त्या अनुषंगाने कौशल्य मॅपिंग चाचण्यांचा आढावा घेऊन उद्योगाला स्वावलंबी बनवण्यावर भर दिला जात आहे. उद्योजकांना शक्मय तितक्या स्थानिक कामगारांना न्याय देण्याचे निर्देश केंद्र सरकारकडून दिले जाऊ शकतात.









