शिक्षकांच्या सहकार्यातून ठळकवाडी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा उपक्रम
प्रतिनिधी/ बेळगाव
गड, किल्ले नेहमीच इतिहासाची साक्ष देतात आणि देशप्रेमासाठी स्फूर्ती देतात. म्हणूनच तर दिवाळीच्या निमित्ताने किल्ले तयार केले जातात. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम व आदर्श जपण्यासाठी या प्रतिकृती साकारल्या जातात. शहरात ठिकठिकाणी किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार करण्यात आल्या आहेत. ठळकवाडी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारात चार किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार केल्या आहेत.

इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षिका एस. टी. पाटील व व्ही. डी. करेगार यांच्या मार्गदर्शनाखाली व सौरभ हुंबरवाडी याच्या नेतृत्वाखाली पन्हाळा गड तयार केला. आठवीच्या विद्यार्थ्यांनी के. एम. गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली विशाल, शहापूरकर आणि सहकाऱयांनी जंजिरा किल्ला तयार केला. नववीच्या विद्यार्थ्यांनी विलास खटावकर व एस. एन. गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली ओंकार जाधव, शिवम चौगुले, अंकुश शिंदे आणि सहकाऱयांनी सिंहगड किल्ल्याची प्रतिकृती केली. नववी ब च्या विद्यार्थ्यांनी एस. एस. कोष्टी यांच्या मार्गदर्शनाखाली यश होसूरकर आणि सहकाऱयांनी पद्मदुर्ग साकारला आहे. त्यांना शिक्षक विवेक पाटील, आंबेवाडीकर व साहाय्यक निखिल राऊळ, परशराम वांगेकर यांचे सहकार्य लाभले.
एसकेई सोसायटीचे चेअरमन किरण ठाकुर, व्हा. चेअरमन एस. वाय. प्रभू, मुख्याध्यापक आर. आर. कुडतुरकर यांच्या प्रोत्साहनामुळे विद्यार्थ्यांनी या प्रतिकृती तयार केल्या आहेत. लोकमान्य संस्था, भगवे वादळ युवक संघटना यांच्या पदाधिकाऱयांनी किल्ल्यांच्या प्रतिकृती पाहून विद्यार्थ्यांची प्रशंसा केली.









