महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी सर्वसाधारणपणे मराठी, इंग्रजी आणि हिंदी या तीन भाषा शिकणे आवश्यक असते. भाषा विषयामध्ये लेखन कौशल्याची परीक्षा घेण्यासाठी निबंध लिहावयास सांगितला जातो. निबंधाच्या विषयांपैकी एका विषयामध्ये एखाद्या घटनेचे वर्णन करणे अपेक्षित असते. दुसऱया प्रकारामध्ये व्यक्तिचित्र किंवा एखाद्या गाव-शहराविषयी माहिती लिहावयास सांगितले जाते. तिसऱया प्रकारामध्ये विद्यार्थ्यांनी कल्पनाशक्तीची भरारी मारणे अपेक्षित असते. सहा शाळांमधील नववी-दहावीच्या तीनशे विद्यार्थ्यांनी लिहिलेले निबंध अलीकडेच तपासले असता असे आढळून आले की 90 टक्के विद्यार्थी सर्व प्रकारचे निबंध पाठांतर करून लिहितात आणि विशेषतः कल्पनाशक्तीमध्ये कमी पडतात.
या प्रश्नाची पाळेमुळे खणल्यावर असे लक्षात येते की आपली शिक्षण व्यवस्था याला कारणीभूत आहे. निबंध आणि पत्र लिहिणे सहावी-सातवीपासून शिकवताना शालेय शिक्षक आदर्श निबंध/पत्र लिहून देतात. लेखन कौशल्य विकसित करताना सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजेच सहावी-सातवीच्या विद्यार्थ्यांनी शिकवल्याप्रमाणे निबंध लिहिण्यास काही हरकत नाही. परंतु त्याचवेळी काही ‘न पढवलेले’ निबंध स्वतःच्या शब्दात लिहिण्याचे प्रशिक्षण शाळेमध्ये मिळणे गरजेचे आहे. परंतु शाळेची कामगिरी ‘किती विद्यार्थी पास झाले?’ यावर ठरते. ही चुकीची पद्धत सुरु झाल्यामुळे बहुतांश शाळांनी सर्व मुलांना पास करण्याचा चंग बांधला आहे. त्यामुळे परीक्षेत येणारे निबंध विद्यार्थ्यांकडून घोटवून घेतले जातात. बाजारात निबंध कसा लिहावा याचे तंत्र शिकवणारी पुस्तके कमी आहेत परंतु तयार केलेले निबंध पाठांतर करून लिहिण्यासाठी बरीच पुस्तके उपलब्ध आहेत. याचे एकूण परिणाम गंभीर आहेत.
‘मी चंद्रावर पाय ठेवला तर…’ हा निबंध लिहिण्यासाठी जीवशास्त्र-भौतिकशास्त्र या विषयाचा अभ्यास पक्का असणे गरजेचे आहे, ज्यामुळे अंतराळवीर अंतराळयानात तरंगत असल्यास रोजच्या व्यक्तिगत आयुष्यात काय अडचणी येऊ शकतात याची जाणीव असावी. त्याचप्रमाणे चंद्रावर उतरल्यावर कमी वजन असल्यामुळे काय करता येईल, त्याचे फायदे-तोटे याचा स्वतंत्रपणे विचार करणे अपेक्षित आहे. निबंध लिहिताना त्या स्वतंत्र विचारांचे प्रतिबिंब कागदावर उमटावे. परंतु असे करणाऱया विद्यार्थ्यांचे प्रमाण पाच टक्केही नाही. कारण निबंध हा नेहमीच मार्कांसाठी लिहिला जातो. मार्क कसे द्यावेत याचे साचे ठरले आहेत त्यामुळे लिहिले जाणारे निबंध साचेबद्ध दिसतात.
‘मी शाळेचा मुख्याध्यापक झालो तर…’ या विषयावर काय लिहिणार? असा प्रश्न मी अनेक वर्गात विचारला त्यावेळी बहुतांश वर्गात भीषण शांतता पसरल्याचे मी अनुभवले आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना बोलते करण्याचा प्रयत्न केल्यावर अनेक ‘हुशार’ विद्यार्थ्यांनी “‘शाळेला शिस्त लावेन’’, “दंगा करणाऱया विद्यार्थ्यांना शिक्षा करेन’’ अशी उत्तरे दिली. “अशाच पद्धतीने शाळा चालवणार असाल तर तुम्हाला मुख्याध्यापक का करायचे?’’ असे विचारल्यावर काही विद्यार्थी-विद्यार्थिनी (आजूबाजूला शालेय शिक्षक नाहीत याची खात्री करून) बोलायला सुरुवात करतात. त्यानंतर “मी मुख्याध्यापक झालो तर प्रत्येक आठवडय़ाला एक डॉक्मयुमेंटरी दाखवेन’’ असे सुचवल्यानंतर विद्यार्थी कल्पना करण्यास सुरुवात करतात आणि “मी मुख्याध्यापक झालो तर कोणालाही मारणार नाही’’, “एखादा विषय शिकवेन’’, “विद्यार्थ्यांना शाळेची भीती वाटेल असे काही करणार नाही’’, “कमी मार्क पडलेल्या विद्यार्थ्यांची काळजी घेईन’’ अशी उत्तरे येतात. कोणत्याही वर्गाचे चित्र असे जर अर्ध्या तासात बदलता येत असेल तर विद्यार्थ्यांकडे कल्पनाशक्ती आहे परंतु त्याला पोषक वातावरण शिक्षण व्यवस्थेमध्ये नाही, असा अर्थ होतो. कल्पनाशक्तीला ठराविक गुणांमध्ये अडकवल्याचे हे भीषण परिणाम आहेत.
‘तिसरे महायुद्ध’, ‘पाकिस्तान/चीनमधल्या विद्यार्थ्यांशी संवाद’, ‘मी करोडपती झाले तर…’, ‘सूर्य सुट्टीवर गेला तर…’, ‘मी वाघ झालो तर…’, ‘मी सरपंच झाले तर….’, ‘मी वार्ताहर झालो तर…’ अशा विषयांवर निबंध लिहिणे किंवा त्या विषयावर दहा मुद्दे सांगणे बहुतांश विद्यार्थ्यांना कठीण जाते कारण समस्त विद्यार्थ्यांचे अवांतर वाचन बंद झाले आहे. दहावीच्या अनेक विद्यार्थ्यांनी दहावीचीच नव्हे तर नववीची पुस्तकेही वाचलेली नाहीत. अपेक्षित प्रश्नांची तयार उत्तरे पाठ केल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांची विचार करण्याची क्षमता लोप पावली आहे. त्या क्षमतेला जाग आणणारी कोणतीही यंत्रणा शिक्षण व्यवस्थेमध्ये कार्यरत नाही.
कोणत्याही बालकाची भन्नाट कल्पना करण्याची क्षमता शाळेमध्ये गेल्यानंतर लोप पावतेच शिवाय घरामध्येही त्यासाठी पोषक वातावरण नसते. ‘मला पंख असते तर….’ अशी कल्पना करून व्यक्त होण्यास पालकांकडून प्रोत्साहन मिळणे आवश्यक आहे. जेवणाच्या वेळी कौटुंबिक चर्चा बंद झाल्या आहेत आणि टीव्ही बघता बघता जेवणाची सवय लागल्यामुळे अशी स्वप्ने बघण्यावर बंधने आली आहेत. लहान मुले जेवत नाहीत म्हणून बरेच पालक टीव्हीवर मुलांचा आवडता कार्यक्रम सुरु करून देतात. कल्पना शक्तीला ओहोटी लागण्यास इथेच सुरुवात होते. टीव्हीवरील कार्यक्रमामध्ये ठराविक ‘पंच’वर हशा आणि टाळय़ांचे आवाज ‘टाकून’ कोणत्या विनोदावर हसायचे हे सुद्धा शिकवले जाते. गाणी ऐकली जात नाहीत तर बघितली जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांना गाण्यांचे शुटींग कसे केले असेल याची कल्पना करता येत नाही. मुले-मुली कथा-कादंबऱया वाचत नाहीत. त्यामुळे त्याचे कल्पनाचित्र त्यांच्या डोळय़ासमोर उभे रहात नाही. चित्रे कशी काढावीत याचेही स्पष्ट आणि ठोस मार्गदर्शन शालेय जीवनात गुणांच्या अपेक्षेनुसार केले जाते. त्यामुळे बहुतांश विद्यार्थी-विद्यार्थिनी हत्तीचे साचेबद्ध चित्र काढतात. निसर्गचित्र काढताना अजूनही दोन डोंगरामधून उगवणारा सूर्य, त्यावर मराठी चार आकडय़ाचे चार पक्षी, डोंगरामधून वाहणारी नदी असेच चित्र काढण्यास शिकवले जाते आणि तसेच चित्र काढल्यास उत्तम गुण दिले जातात. एखाद्या विद्यार्थ्याने ‘आईस्क्रीम खाणारा सूर्य’ काढल्यास त्याला गुण मिळणार नाहीत. इसापनीतीमधल्या गोष्टी सांगितल्यावर अजूनही पालक-शिक्षक “यावरून आपण काय शिकलात?’’ असे विचारतात. ससा आणि कासव यांच्या शर्यतीच्या गोष्टीबद्दल साचेबद्ध अनुमान काढणे अपेक्षित असते. “सिंहाला विहिरीत उडी मारायला लावणाऱया सशाने सिंहाची फसवणूक केली’’ असे कोणा विद्यार्थ्याने सांगितले तर त्याला शालेय वर्गात प्रोत्साहन दिले जात नाही. एकूणच कल्पनाशक्तीची भरारी मारणारे पंख छाटणाऱया शिक्षण पद्धतीवर कोण उपाय शोधणार?
6-सुहास किर्लोस्कर








